मी पण पोहोचलेला माणूस, मला… अजित पवार यांचा नेहमीप्रमाणे ‘त्या’ विषयावरून पारा चढला!
अजित पवार यांचा पारा कधी चढेल काही सांगता येत नाही. एक असा विषय आहे ज्यावर पवार नेहमी बोलणं टाळतात. टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्येही त्या विषयावर विचारल्यावर अजित पवारांचा पारा चढलेला दिसला.

मुंबई : राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. अजित पवार यांची एक खास गोष्ट म्हणजे काम करण्याची पद्धत. घड्याळाचा काटा चुकेल पण पवारांनी दिलेली वेळ नाही, कारण महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या कामाचा धडाका पाहायला मिळायचा. आता जरी सत्ता नसली तरी त्यांचे दौरे चालूच आहेत. रोखठोक बोलण्यामुळेही दादा कायम चर्चेत असतात. अजित पवार यांचा पारा कधी चढेल काही सांगता येत नाही. एक असा विषय आहे ज्यावर पवार नेहमी बोलणं टाळतात. टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्येही त्या विषयावर विचारल्यावर अजित पवारांचा पारा चढलेला दिसला.
नेमका कोणता विषय ज्यामुळे चढतो दादांचा पारा?
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेचा शपथविधीबाबत अजित पवार यांना विचारल्यावर ते बोलणं टाळतात. मुलाखतीमध्ये पहाटेच्या शपथविधीसंदर्भात विचारल्यावर, एखादी व्यक्ती विषयावर बोलणं टाळते त्यावेळेस ती व्यक्ती ते टाळणारच. तुम्ही त्याला मुर्ख समजता का? मी कधीच बोलणार नाही. मी पण पोहोचलेला माणूस आहे. मला तो विषय काढायचा नाही आणि नवे प्रश्न निर्माण करायचा नाही. मीडिया प्रश्न विचारु शकते तर उत्तर देणं माझ्यावर आहे, असं अजित पवार म्हणाले.
सात वाजता असेल तर पहाट म्हणत नाही, सकाळ म्हटलं जातं. मग सकाळच म्हणा ना. मला त्यावेळेस ट्वीट करावसं वाटलं. ते ट्वीट मी केलं. त्या घटनेला आता तीन वर्ष झाली. त्यावेळी माझ्यावर कारवाई झाली नाही त्याचं उत्तर शरद पवार हेच देऊ शकतात, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे सर्व राजकीय वर्तुळ हादरून गेलं होतं. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस यांना हाताशी पकडत एक नवीन समीकरण तयार केलं होतं. मात्र पवारांनी केलेलं बंड त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारं होतं. मात्र पवार काही दिवसात स्वगृही परतले आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. या बंडाला 3 वर्षे झाली असली तरी राजकीय इतिहासात याची नोंद ठेवली गेली आहे.
