कोरोना रुग्णसंख्येत घट होऊनही महाराष्ट्रात निर्बंध का? तुमच्या सर्व शंकांची A to Z उत्तरे

जेव्हा महाराष्ट्रात दिवसाला सरासरी 25 हजार रुग्ण निघत होते, तेव्हा महाराष्ट्रात अनलॉक मोहिम राबवली गेली, मात्र आता रुग्णसंख्या 10 हजारांच्या आत येऊनही, संपूर्ण राज्य पुन्हा निर्बंधांच्या फेऱ्यात अडकलंय (Maharashtra Government why increased restrictions in Maharashtra).

कोरोना रुग्णसंख्येत घट होऊनही महाराष्ट्रात निर्बंध का? तुमच्या सर्व शंकांची A to Z उत्तरे
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : जेव्हा महाराष्ट्रात दिवसाला सरासरी 25 हजार रुग्ण निघत होते, तेव्हा महाराष्ट्रात अनलॉक मोहिम राबवली गेली, मात्र आता रुग्णसंख्या 10 हजारांच्या आत येऊनही, संपूर्ण राज्य पुन्हा निर्बंधांच्या फेऱ्यात अडकलंय. रुग्ण घटल्यानंतरही निर्बंध लादल्यामागचं पहिलं कारणं म्हणजे कोरोनााच डेल्टा प्लस व्हेरियंट. आणि दुसरं सर्वात प्रमुख कारण म्हणजे दुसऱ्या लाटेवेळी अमरावती जिल्ह्यानं शिकवलेला धडा (Maharashtra Government why increased restrictions in Maharashtra).

जानेवारी महिन्यात पूर्ण महाराष्ट्र कोरोना संपल्याचा भ्रमात होता. मात्र फेब्रुवारीत अमरावती आणि अचलपूरमध्ये रुग्णवाढ झाली. तेव्हा सरकारने फक्त अमरावतीला लॉकडाऊन करुन इतर सर्व जिल्हे सुरु ठेवले. त्याचा परिणाम मार्चमध्ये दिसला. विशेष म्हणजे भारतात कोरोनाची दुसरी लाट पहिल्यांदा महाराष्ट्रातूनच सुरु झाली. आता तिसऱ्या लाटेचा धोका का आहे, आणि बऱ्यापैकी अमरावतीसारखीच स्थिती कोणकोणत्या जिल्यांमध्ये आहे, ते समजून घेतलं पाहिजे (Maharashtra Government why increased restrictions in Maharashtra).

महाराष्ट्रातील निर्बंधाचे आणखी प्रमुख कारणे :

फेब्रुवारीच्या सुरुवातीला म्हणजे दुसऱ्या लाटेआधी अमरावतीचा पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांचा आसपास होता. सध्या रत्नागिरीचा पॉझिटिव्ही रेट 10 टक्के आहे. सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट सुद्धा 10 टक्क्यांच्यावर आहे. साताऱ्यातला पॉझिटिव्ही रेट 9.50 टक्क्यांवर गेलाय आणि कोल्हापुरातही 8 टक्के रुग्ण बाधित निघतायत. चारही जिल्ह्यांतले हे आकडे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंधांचं प्रमुख कारण आहेत.

अमरावतीत तिसऱ्या लाटेला सुरुवात?

फेब्रुवारी महिन्यात एकट्या अमरावती जिल्ह्यात मुंबईपेक्षा जास्त रुग्ण निघत होते. त्याचप्रमाणे सध्या कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यात रोज मुंबईपेक्षाही जास्त रुग्ण सापडतायत. यातलं दुसरं साम्य म्हणजे जेव्हा अमरावतीतून दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली, तेव्हा अमरावतीत कोरोनाचं म्युटेशन झालं होतं. फेब्रवारीत अमरावती जिल्ह्यात E484Q हे म्युटेशन म्हणजे रुप बदललेला कोरोना विषाणू रुग्णांमध्ये सापडला होता. आणि आत्ता सुद्दा देशातले सर्वाधिक डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटचे जवळपास निम्मे रुग्ण एकट्या महाराष्ट्रातच आहेत.

युरोप, ब्रिटनमध्ये जे घडलं ते दोन महिन्यांनी भारतातही घडलं

जी चूक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरली, ती चूक संभाव्य तिसऱ्या लाटेवेळी करणं सरकारला परवडणारं नाही. कोरोनाच्या डेल्टा प्लसमुळे नेमकं काय होईल, याबाबत तज्ज्ञांमध्येही मतभेद आणि मतंमतांतरं आहेत. मात्र जे-जे युरोप आणि खासकरुन ब्रिटनमध्ये घडलं, ते-ते बरोब्बर 2 महिन्याच्या अंतरानं भारतातही घडलंय.

ब्रिटन आणि भारतातील पहिली-दुसरी लाट

एप्रिल 2020 ला ब्रिटनमध्ये कोरोनाची पहिली लाट आली. त्याच्या बरोब्बर दोन महिन्यानतंर म्हणजे मे 2020 ला भारतात पहिल्या लाटेची सुरुवात झाली. सप्टेंबर 2020 पर्यंत भारतात पहिली लाट ओसरली. त्याच्या बरोबर दोन महिन्यानंतरच ब्रिटनमध्येही दुसरी लाट संपत आली होती.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू

नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये जगात पहिल्यांदा कोरोनाचं म्युटेशन झाल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्याच्या बरोबर दोन महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत भारतातही कोरोनाचं म्युटेशन झालं. जानेवारी महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाची सर्वात भीषण ठरलेली दुसरी लाट आली. त्याच्या बरोबर दोन महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतात सुद्धा आतापर्यंत सर्वात घातक ठरलेल्या दुसऱ्या लाटेनं पाय पसरले.

ब्रिटनमध्ये सध्या चौथी लाट

सध्यस्थितीत ब्रिटनमध्ये चौथ्या लाटेची सुरुवात झालीय. त्यामागे डेल्टा प्लसचा विषाणू असल्याचे दावे आहेत.
म्हणूनच बरोबर दोन महिन्यानंतर म्हणजेच सप्टेंबरमध्ये भारतातही कोरोनाची तिसरी लाट येण्याचे दावे आहेत. म्हणूनच रुग्णसंख्या कमी असली, तरी सरकार कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. निर्बंधाची ही सर्व तयारी आत्तासाठी नसून, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठीची आहे.

संबंधित बातम्या : 

दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, डेल्टा प्लसचा धोका, निर्बंधात बदल, अकोल्यात काय सुरु काय बंद?

दुकाने 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा, सिनेमागृहे बंदच, जाणून घ्या जळगाव जिल्ह्यात नवे नियम काय ?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, मॉल्स बंद, दुकानं 4 वाजेपर्यंत सुरु, सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI