Rain Alert: आता काही खरं नाही… महाराष्ट्र दुहेरी कचाट्यात…सोसाट्याचा वारा नि गारपिटीचा धोका

Maharashtra Heavy Rain Alert: महाराष्ट्रासाठी येता आठवडा अत्यंत धोकादायक असू शकतो. अनेक जिल्ह्यात सोसाट्याचा वारा सुटेल, काही ठिकाणी गारपीट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. काय आहे हवामानाचा अंदाज?

Rain Alert: आता काही खरं नाही... महाराष्ट्र दुहेरी कचाट्यात...सोसाट्याचा वारा नि गारपिटीचा धोका
गारपिटीचा धोका
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 09, 2026 | 5:15 PM

Maharashtra Heavy Rain Alert May Hailstorm: राज्यात पुढील आठवड्यात 14 मे ते 20 मे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा राज्याला बसेल. या आठवड्याच्या अखेरीस काही भागात पावसाचे आगमन झाले. धुळीचे लोट उठले. काही ठिकाणी वीजांचा कडकडाट झाला. तर पुढील आठवड्यात मुसळधार पाऊस राज्याला झोडपून काढण्याची शक्यता आहे. तर सोसाट्याचा वाराच नाही तर राज्यातील अनेक भागात गारपीट होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेतीच्या कामाची लगबग करावी लागणार आहे. कारण पुढे जुलै महिन्यात अल निनोमुळे पाऊस कमी असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

कोकणमध्ये पावसाचा सांगावा

हवामान विभागानुसार, कोकण क्षेत्रातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण वारे वाहतील. दमट हवामानाने घामाटा निघेल.सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात सोसाट्याचा वारा सुटेल. वीज कडकडणार आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल.

सोसाट्याचा वारा आणि गारपीट

हवामान विभागाने धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील काही पट्ट्यात गारपि‍टीचा अंदाज वर्तवला आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, सोलापूर जिल्ह्यात वेगवान वारे वाहतील. वि‍जांचा कडकडाट होईल. तर गारपीट होण्याचीही शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही हलका पाऊस पडेल.

रत्नागिरीमध्ये सायंकाळच्या दरम्यान प्रचंड धुळीचे वादळ

ढगांची दाटीवाटी आणि जोरदार वाऱ्यासह रत्नागिरी मध्ये धुळीचे वादळ आले. अचानक आलेल्या या धुळीच्या वादळामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी मध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचे सावट आहे. संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी लागली. संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते- नाले पावसाने तुडुंब भरले. वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची संगमेश्वर मध्ये एन्ट्री झाली. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिक व नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारी कडाक्याचे ऊन व सायंकाळी अवकाळी पाऊस अशा मिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसला. सततच्या पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला.

Follow Us