Maratha Morcha : खचाखच भरलेल्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाचा आवाज; या दोन आमदारांची उपोषणस्थळी लागलीच धाव

Maratha Reservation Mumbai Morcha : मुंबईत आझाद मैदान मराठा आंदोलकांनी खचाखच भरून गेले आहे. मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा श्रीगणेशा केला. आता आरक्षणाशिवाय माघार नाही असे त्यांनी जाहीर केले. दरम्यान दोन आमदारांनी तातडीने त्यांची भेट घेतली.

Maratha Morcha : खचाखच भरलेल्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाचा आवाज; या दोन आमदारांची उपोषणस्थळी लागलीच धाव
दोन आमदार उपोषणस्थळी
| Updated on: Aug 29, 2025 | 12:22 PM

मुंबईत आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची त्सुनामी आली आहे. मराठा आंदोलकांनी मैदाना तुडुंब भरलं आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रमुख मागणी आहे. तर सगेसोयरे हा अध्यादेश लागू करण्याची सुद्धा मागणी आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आता मागे हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. सरकारने आता या प्रकरणाचा एकदाचा तो सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान उपोषणाची सुरूवात होताच बीड मधील दोन आमदारांनी तातडीने सभास्थळी धाव घेत जरांगेंशी चर्चा केली.

बीडचे दोन आमदार सभास्थळी

बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाशदादा साळुंके हे दोन आमदार तातडीने उपोषणस्थळी दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर अगदी काही वेळातच दोन्ही आमदार तिथे पोहचले. त्यांनी यावेळी जरांगेशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली. यापूर्वीही या दोन्ही आमदारांनी जरांगेच्या मोर्चांना आणि आंदोलनांना पाठिंबा जाहीर केला आहे.

ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ -संदीप क्षीरसागर

आझाद मैदानावर बीडचे दोन आमदार जरांगेंच्या उपोषणस्थळी पोहचले. मनोज जरांगे हे सर्व समाजासोबत आहे. सरकारने ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. तर आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

खासदार रवींद्र चव्हाण पण सहभागी होणार

नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण होणार जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. खासदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस मुद्दामहून चालढकल करत आहेत. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर निकाली काढावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

थेट रस्त्यावरच आंथरूण

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार आहेत आणि आझाद मैदानही मराठा समाज मोठ्या संख्येने आल्याने आझाद मैदान तुडुंब भरल्याने, आझाद मैदानाबाहेर काही आंदोलकांनी थेट रस्त्यावर अंथरून टाकले आहे.

मराठ्यांची मोठी लाट

मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकहून मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. इगतपुरी येथील समृद्धी महामार्गावर जिल्ह्यातून आलेले मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी जमले. शेकडो वाहनांच्या माध्यमातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत. मुंबईतील आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातून रसद पुरवण्यात येणार आहे.