Maratha Reservation : फडणवीस, अजितदादा यांनी जालन्यात जाणं टाळलं?, कारण काय?; जरांगे पाटील उपोषण सोडणार?
मराठा आंदोलनासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा 17 वा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्याकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे जालन्यात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी हे उपोषण पुकारलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात आल्यावरच उपोषण सोडेन असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जातील असं सांगितलं जात होतं. पण काल हे तिन्ही नेते जालन्यात गेले नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात पोहोचत आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकटेच अंतरवाली सराटीत जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादला पोहोचले असून ते जालन्याच्या दिशेने बायरोड निघाले आहेत. अवघ्या अर्धा पाऊण तासात ते जालन्यात पोहोचतील. त्यांच्यासोबत एकही मंत्री नसल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण हे तिन्ही मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जालन्यात जाणं का टाळलं असा सवाल केला जात आहे.
बैठकांमुळे दौरा टाळला
अजित पवार हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत जालन्यात जाणार असल्याची माहिती होती. मात्र अजित पवार हे आता अंतरवाली सराटी इथै आज जाणार नाहीत हे स्पष्ट झालंय. अजित पवार हे सध्या मंत्रालयात दाखल झालेले आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर त्यांच्या नियोजित बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील काही वेळापूर्वी अजित पवार यांच्या भेटीसाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. नियोजित बैठकांमुळे अजित पवार अंतरवाली सराटीत गेले नसल्याचं सांगितलं जात आहे.
फडणवीसही नाही
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्याशी संबंधित काही मागण्या मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यामुळे ते जालन्यात येऊन आंदोलकांची समजूत काढण्याची आणि त्यांना हमी देण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण फडणवीसही जालन्याला गेले नाहीत. शिवाय फडणवीस यांच्या अजमेर येथील पाच ठिकाणी कार्यक्रम आहेत. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित असल्याने ते जालन्यात येऊ शकले नसल्याचं सांगितलं जात आहे.
तरीही निर्णय उशिरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यावर उपोषण सोडेन असं जरांगे पाटील म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री आल्यानंतरही जरांगे पाटील उपोषण सोडणार नसल्याचं सांगितलं जात आहे. जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर संध्याकाळी आपली भूमिका मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे जरांगे पाटील हे संध्याकाळीच उपोषण सोडतील असं सांगितलं जात आहे.
