श्रीमंत गेले फार्महाऊसवर, पण गरिबांच्या घरात बसायला जागा नाही, त्यामुळे ते रस्त्यावर : आव्हाड

श्रीमंत गेले फार्महाऊसवर, पण गरिबांच्या घरात बसायला जागा नाही, त्यामुळे ते रस्त्यावर : आव्हाड

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, तरीही काही लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. यावर जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.

चेतन पाटील

|

Apr 02, 2020 | 2:12 PM

मुंबई : “सामाजिक जाणीव नसलेली लोकं गरिबांना दोष देत आहेत (Minister Jitendra Awhad). माझं तर स्पष्ट मत आहे, हा रेशन कार्डवाल्यांचा दोष नव्हता. हा पासपोर्टवाल्यांचा दोष होता. हा भारतात उत्पादित झालेला रोग नाही, बाहेरुन आलेला रोग आहे. कोण कुठे गेलं होतं त्याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. तुम्हाला दक्षिण मुंबईत गर्दी दिसणार नाही. कारण सगळे फार्महाऊसवर निघून गेले आहेत. मात्र गरिबांना घरात बसायला जागा नाही. त्यामुळे ते रस्त्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर येऊन बसतात”, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) म्हणाले.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, तरीही काही लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. यावर जितेंद्र आव्हाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.

“आता थोडीशी गर्दी कमी झाली आहे. आपण उगाच लोकांना दोष द्यायला नको. मुंब्र्यात बरेच लोक घराबाहेर पडायचे. आता मोजकेच लोक बाहेर पडतात. दिवसेंदिवस रुग्ण वाढल्याची माहिती समोर आली तशी गर्दी कमी झाली. प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती वाटते. आता लोकंही गंभीर झाले आहेत”, असं आव्हाड म्हणाले.

“कळवा पूर्व भागातील सामाजिक वास्तवही आपण समजून घ्यायला पाहिजे. लोक अत्यंत छोट्या घरांमध्ये राहतात. घरातील लोकांची संख्या कमीतकमी 5 आणि जास्तीत जास्त 12 ते 15 अशी आहे. फक्त जेवणापुरता त्या घराचा वापर होतो. एरव्ही कुठला माणूस कुठे झोपतो हे माहित नसतं. एका 10 बाय 10 च्या खोलीत एक पलंग, कपाट, एक छोटसं किचन, पाणी ठेवायची जागा आहे. त्यामध्ये जागा उरते ती फक्त 6 बाय 6 फुटाची. यामध्ये किती लोकं बसू शकतील? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

“दक्षिण मुंबईत गर्दी दिसणार नाही. तिथे प्रचंड मोठी घरं आहेत. सोसायटींमध्ये 2 बेडरुम हॉल किचन किंवा 1 बेडरुम हॉल किचन आहे. मात्र, ज्याचं किचन म्हणजेच घर आहे त्या माणसांची बाजू मी सक्षमपणाने मांडतोय. आपल्याला हे सर्व सोपं वाटतं की, घरी बसा. पण त्याच्यापेक्षा ते काय करतात, रस्त्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर येऊन बसतात. याचा अर्थ त्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही असं नाही. घरात बसणार तरी कसं? बसायला गेले तर माणसांना जागाच नाही. या वास्तवाकडेही लक्ष दिलं पाहिजे”, असं आव्हाड म्हणाले.

“श्रीमंतांच्या वस्त्यांमध्ये खूप आराम आहे. मुंबईतले अनेक श्रीमंत आपापल्या फार्महाऊसवर निघून गेले आहेत. सगळे अलिबागचे फार्म हाऊस फूल आहेत. मित्र-मैत्रिणी तिथे सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहेत म्हणजेच आराम करत आहेत. कुणी आराम कसा करायचा याबाबत मला बोलायचं नाही. पण गरिब दिवसाला शंभर रुपये कमवत होता. उद्याचे शंभर रुपये कुठून आणायचे? हा प्रश्न उभा राहिलेला आहे. चार-पाच दिवसांमध्ये कमवलेले सगळे पैसे संपलेले आहेत. उद्या जेवणाचं काय होणार? या भीतीपोटी तो गांगरुन गेला आहे. मी असे अनेक घरं बघतोय जे एकवेळ जेवत आहेत. हे वास्तव समोर यायला हवं ज्यामुळे जे रेशन मोदी फुकटात देणार आहेत ते लवकर यायला मदत होईल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें