मोदी मंत्रिमंडळात ‘टायगर’ची डरकाळी; राष्ट्रवादीला कॅबिनेटची संधी? मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाला लॉटरी?

Modi Cabinet Reshuffle Ajit Pawar NCP: मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत आहे. काही मंत्र्यांना थांबवण्यात येऊ शकते, तर काहींना दुसर्‍या खात्याची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या सेनेला महत्त्वाची पदं मिळण्याची शक्यता आहे. तर दादांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेटची संधी मिळू शकते का? या चर्चांना उधाण आले आहे.

मोदी मंत्रिमंडळात टायगरची डरकाळी; राष्ट्रवादीला कॅबिनेटची संधी? मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाला लॉटरी?
मोदी मंत्रिमंडळात 'टायगर'ची डरकाळी; राष्ट्रवादीला कॅबिनेटची संधी?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 28, 2026 | 12:21 PM

Modi Cabinet Reshuffle Ajit Pawar NCP: लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. ऑपरेशन टायगरमुळे एकनाथ शिंदे सेनेचे पारडे जड झाले आहे. शिंदे सेनेच्या दोन खासदारांना कॅबिनेटची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने मोठ्या घडामोडी घडल्या. सध्या या पक्षात शांतता आहे. पण मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये जागा मिळावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी प्रतिक्षेत आहेत. पक्षाची राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात येत होती. त्याला पक्षाने नकार दिला होता. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात तरी दादांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेटची संधी मिळू शकते का? या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेचे NDA मधील पारडे जड

उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी शिंदे सेनेत नुकताच प्रवेश केला. यामुळे केंद्रात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे एकूण 13 खासदार झाले आहेत. तेलगू देसम पक्षानंतर एनडीएत शिंदे सेना चौथ्या स्थानावर पोहचली आहे. मंत्रिमंडळातही आता वजन वाढावे अशी अपेक्षा शिंदे सेनेची आहे. शिंदे सेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे मंत्रि‍पदाची जबाबदारी आहे.

तर सध्याच्या चर्चेनुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर अथवा खासदार संजय जाधव यांना मोदी मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळू शकते. खासदार प्रतापराव जाधव हे गेल्या काही वर्षांपासून सलग मंत्रि‍पदावर आहेत. त्यांना संसदीय जबाबदारी सोपवली जात असल्याचा दावा ही करण्यात येत आहे. अर्थात या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. लवकरच केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होईल आणि कुणाला संधी मिळाली हे चित्र समोर येईल.

आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळणार?

अजितदादा यांना जाऊन आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. महायुतीत दादांचा पक्ष सहभागा झाला. तेव्हा मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट पदाची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. पण त्यावेळी ही मागणी मान्य होऊ शकली नाही. मोदी कॅबिनेटच्या विस्ताराच्या चर्चा होत असताना आता तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्रिपद द्यावे अशी मागणी होत आहे. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळणार का? असा सवाल केल्या जात आहे.

राज्यमंत्री पदावर बोळवण?

केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याचे एक राज्यमंत्री पद बाकी आहे. एनडीए सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला राज्यमंत्री पद आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावेदार समजले जाणारे प्रफुल पटेल यांनी कैबिनेट मंत्री म्हणून काम केले असल्याने राज्यमंत्री पद नाकारलं होतं तर सुनील तटकरे यांना मंत्रिपदा ऐवजी संसदीय कमिटीत स्थान देण्यात आलं होतं.मागील २ वर्षात कैबिनेट मंत्रिपदाच्या अपेक्षेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यमंत्री पद स्वीकारलं नव्हतं. आता राष्ट्रवादीला पुन्हा राज्यमंत्री पदाची ऑफर देण्यात येईल का असा सवाल ही विचारल्या जात आहे. त्यावर पक्षाची काय भूमिका असेल हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us