
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक मोठी आणि महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांनी मुंबईत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या समीकरणामुळे मुंबई महापालिकेच्या रणांगणात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकतंच वंचित बहुजन आघाडीने एक प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे. या अधिकृत पत्रानुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. विशेष म्हणजे, या ६२ जागांच्या यादीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सही असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यात आता कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही ऑनलाईन बैठकीद्वारे मान्यता दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडे देण्यात आलेल्या ६२ जागांमध्ये वॉर्ड क्र. ६, ११, १२, ८४, ९५, १२७, १५३ आणि २२५ यांसारख्या विविध महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.
| विभाग (Zone/Area) | वॉर्ड क्रमांक (Ward Numbers) |
| आर/उत्तर (दहिसर परिसर) | 6, 11, 12 |
| पी/उत्तर (मालाड परिसर) | 30, 32, 33, 34, 35, 38 |
| के/पश्चिम (अंधेरी प. परिसर) | 59, 60, 61, 62 |
| के/पूर्व (अंधेरी पू. परिसर) | 80, 82, 83, 84 |
| एच/पश्चिम (वांद्रे प. परिसर) | 94, 95, 96, 97 |
| जी/उत्तर (धारावी/माहिम) | 184, 185, 188, 189 |
| एल विभाग (कुर्ला परिसर) | 151, 152, 153, 154, 155 |
| एम/पूर्व (गोवंडी/मानखुर्द) | 123, 124, 125, 126, 127, 128 |
| एन विभाग (घाटकोपर परिसर) | 117, 118 |
| दक्षिण मुंबई (कुलाबा/मुंबादेवी) | 210, 212, 214, 225, 227 |
| इतर वॉर्ड | 24, 65, 72, 100, 102, 105, 131, 134, 138, 143, 168, 169, 199, 202, 205 |
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या युतीचे स्वागत करताना सांगितले की, काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. १९९९ नंतर राजकीय कारणांमुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत होते, मात्र तब्बल २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष मुंबईच्या विकासासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून विचारांची आघाडी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या युतीमुळे दलित, मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या मतांमध्ये होणारे विभाजन या युतीमुळे थांबण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा काँग्रेस-वंचितला होऊ शकतो. एकीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने निर्माण झालेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने हा वंचित कार्डचा मास्टरस्ट्रोक वापरल्याचे पाहायला मइळत आहे. मात्र या युतीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.