खंडणी वसुलीप्रकरणी सचिन वाझेला दिलासा नाहीच; 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

(Mumbai court sends Sachin Vaze to police custody till November 13)

खंडणी वसुलीप्रकरणी सचिन वाझेला दिलासा नाहीच; 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
Sachin Vaze

मुंबई: खंडणी वसुलीप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे.

गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. वाझेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची कोठडी संपल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं असता त्याच्या कोठडीत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

हिरेन प्रकरणाचाही आरोपी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्यात आली होती. ही गाडी वाझेंनी ठेवल्याचा आरोप आहे. या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोपही वाझेंवर आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी एनआयएकडून वाझेचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाझेचा ताबा पोलिसांना देण्यात आला.

आरोप काय?

गोरेगावमधील विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याने सचिन वाझे, परमबीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज पटेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. माझं पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी- फेब्रुवारी 2020 पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला होता.

अग्रवाल यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार 384 ,385 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी सुमित सिंह याला अटक केली आहे. बोरीवली कोर्टाने आरोपीला 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं होतं.

कोण आहेत सचिन वाझे?

सचिन वाझे हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.

घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले.
सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.

 

संबंधित बातम्या:

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर

दाऊदच्या साथीदारासोबत अनिल देशमुख ‘सह्याद्री’त काय करत होते?; मोहित कंबोज यांचा सवाल

कंबोज यांच्या आरोपांनंतर नवाब मलिकांचं ट्विट, उद्या वानखेडे आर्मीचा पर्दाफाश करणार

(Mumbai court sends Sachin Vaze to police custody till November 13)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI