Mumbai Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई लोकलची गती मंदावली, वेळापत्रकात मोठा बदल
३० नोव्हेंबर रोजी मध्य, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे लोकल सेवा विस्कळीत होणार असून अनेक फेऱ्या रद्द किंवा विलंबाने धावणार आहेत.

असंख्य मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यामुळे मुंबई लोकलच्या तांत्रिक कामांसाठी आज ३० नोव्हेंबरला मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरीय नेटवर्कवर आवश्यक अभियांत्रिकी, देखभाल आणि सुरक्षा कामे करण्यासाठी मुख्य आणि हार्बर मार्गावर पाच-पाच तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या तांत्रिक कामांमुळे लोकल सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होणार आहे. यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर CSMT ते विद्याविहार स्थानकांदरम्यान तांत्रिक कामासाठी पाच तासांचा महत्त्वाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10:55 ते दुपारी 03:55 या वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गांवर असेल. या ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. या बदलामुळे अनेक लोकल सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावतील. विशेषतः जलद मार्गावरून लोकल धावणार असल्याने मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड यांसारख्या धीम्या मार्गावरील स्थानकांवर लोकलचा थांबा उपलब्ध नसेल. त्यामुळे प्रवाशांनी दादर, कुर्ला यांसारख्या मोठ्या स्थानकांवरून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हार्बर मार्गावरील स्थिती काय?
हार्बर रेल्वे मार्गावर सुद्धा याच रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 04:05 वाजेपर्यंत पनवेल ते वाशी या विभागादरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे CSMT ते पनवेल/बेलापूर दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने CSMT ते वाशी दरम्यान विशेष अप आणि डाउन लोकल फेऱ्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे उरण मार्गिकेवरील (पोर्ट लाईन) लोकल सेवा या काळात नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना कोणताही अडथळा येणार नाही.
ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक
मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावरही तांत्रिक कामांसाठी ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक अप लाईनवर सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 पर्यंत आणि डाऊन लाईनवर सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 पर्यंत चालेल. ब्लॉकच्या वेळेत ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. मात्र, प्रवाशांना मोठा दिलासा देण्यासाठी ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहतील, जेणेकरून ट्रान्स-हार्बर मार्गावरील अत्यावश्यक प्रवासावर मोठा परिणाम होणार नाही. तसेच हार्बर मार्गाप्रमाणेच, या मार्गावरही ब्लॉक काळात पोर्ट मार्ग (उरण) उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वेवर नाईट ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी हा रविवार दिलासादायक ठरणार आहे. मुंबई सेंट्रल ते माहीम दरम्यान जलद अप आणि डाउन मार्गावर घेण्यात येणारा मेगाब्लॉक शनिवारी मध्यरात्री 12:15 ते रविवारी पहाटे 04:15 या वेळेत घेण्यात आला आहे. त्यामुळे दिवसा पश्चिम रेल्वे मार्गांवर फिरण्याचा किंवा प्रवास करण्याचा प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना कोणताही अडथळा येणार नाही. नाईट ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील अप आणि डाउन लोकल सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे रात्री उशिराच्या काही फेऱ्या रद्द किंवा विलंबाने धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
