Mumbai Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई लोकलची गती मंदावली, वेळापत्रकात मोठा बदल
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज (रविवार, २६ ऑक्टोबर) अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवासाला सुमारे १५ मिनिटे उशीर होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी.

असंख्य मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी आज रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी मुंबई विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा आणि मुलुंड या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे. यामुळे उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ पासून दुपारी ३.४५ वाजेपर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात आणि मार्गामध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रवाशांच्या सेवेवर परिणाम होणार आहे.
माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकातून डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या वळवण्यात आलेल्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या सर्व निर्धारित धीम्या थांब्यांवर थांबतील. त्यानंतर ठाण्यापलीकडे कल्याण, कसारा किंवा कर्जत जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या मार्गातील बदलामुळे लोकलला त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचण्यास निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटांपर्यंत उशीर होण्याची शक्यता आहे.
गंतव्यस्थानावर सुमारे १५ मिनिटे उशिरा
तर ठाण्यातून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यानच्या त्यांच्या सर्व निर्धारित धीम्या थांब्यांवर थांबून पुढे धावतील. त्यानंतर, माटुंगा स्थानकात या लोकल पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या बदलांमुळे अप जलद मार्गावरील या लोकलदेखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा त्यांच्या गंतव्यस्थानावर सुमारे १५ मिनिटे उशिरा पोहोचू शकतात.
रेल्वे मार्गाची पायाभूत सुविधा अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी हा देखभाल ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांनी हे बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. या देखभालीची कामे पूर्ण झाल्यावर दुपारी ३.४५ नंतर लोकल सेवा पुन्हा पूर्ववत होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
