लोकल पकडण्याच्या नादात तोल जाऊन थेट ट्रॅकवर… डोंबिवली स्थानकात काय घडलं ?
तब्बल 20 मिनिटे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर रेल्वे पोलीस, डोंबिवली जीआरपी पोलीस आणि काही प्रवाशांच्या मदतीने या महिलेस सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

Mumbai Local Train Accident : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलमधून हजारो प्रवाशी प्रवास करतात. मुंबई लोकलमध्ये सकाळी आणि संध्याकाळी ट्रेनमध्ये चढायलाही जागा नसते. मुंबई लोकलमधून दररोज जवळपास 63 लाख प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. अशातच डोंबिवली स्थानकात एक धक्कादायक घटना घडली. लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने एक महिला रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनमध्ये अडकल्याची घटना समोर आली आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. आता डोंबिवली रेल्वे स्थानकावर एक मोठी दुर्घटना होता होता टळली. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेचा तोल गेल्याने ती रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनच्या मध्ये अडकली. मानसी संजय किर असे या महिलेचे नाव असून ती 28 वर्षांची आहे. या घटनेचा एक सीसीटिव्ही व्हिडीओही समोर आला आहे.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
या व्हिडीओत एक महिला रेल्वे ट्रॅक आणि लोकलमध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी अनेक प्रवाशी आजूबाजूला गर्दी करुन उभे आहेत. यानंतर डोंबिवली जीआरपी पोलीस आणि काही प्रवाशांच्या मदतीने तिला सुखरुप बाहेर काढलं जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली आहे. आज सकाळी 8.33 च्या सुमारास ही घटना घडली.
पायाला किरकोळ दुखापत
कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल डोंबिवलीला आली. यावेळी डोंबिवली परिसरात राहणारी मानसी नेहमीप्रमाणे गाडी पकडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनमध्ये अडकली. तब्बल 20 मिनिटे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर रेल्वे पोलीस, डोंबिवली जीआरपी पोलीस आणि काही प्रवाशांच्या मदतीने या महिलेस सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या महिलेला पायाला किरकोळ दुखापत झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी रेल्वे पोलिसांनी तात्काळ कृती करून त्या महिलेला सुखरुप बाहेर काढले.
