Breaking News : मध्य रेल्वे कोलमडली, विक्रोळीत रेल्वे रुळाला तडा; वेळापत्रकात मोठा बदल
मुंबईत मध्य रेल्वेची लोकल वाहतूक सकाळी कामाच्या वेळेत तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली. विक्रोळी आणि कांजूरमार्ग दरम्यान डाऊन स्लो मार्गावरील लोकलला तडा गेल्याने सेवा ठप्प झाली. यामुळे हजारो प्रवाशांना अर्धा तास मनस्ताप सहन करावा लागला.

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ऐन सकाळी कामाच्या वेळेत मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. मुंबईतील विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्टेशनदरम्यान डाऊन स्लो मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला आहे. त्यामुळे गेल्या अर्धा तासापासून लोकल सेवा ठप्प झाली आहे. यामुळे हजारो चाकरमान्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान ठाणे/कल्याण दिशेने जाणाऱ्या डाऊन स्लो मार्गावर रेल्वेच्या ट्रॅकला तडा गेल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळाली. लोकल ट्रॅकला तडा गेल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने तात्काळ संबंधित मार्गावरील वाहतूक थांबवली आहे. यानंतर रेल्वेच्या तांत्रिक आणि सुरक्षा पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले.
साधारण तासाभराने या तडा गेलेल्या रेल्वे ट्रॅकची तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करण्यात आली. मात्र, प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता या बिघाड झालेल्या मार्गावर लोकल गाड्यांना धिम्या गतीने चालवण्यात येणार आहे. सध्या या लोकल ट्रॅकवरुन ३० किमी प्रतितास वेगमर्यादेत लोकल चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या लोकलची वाहतूक ही अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरु आहे.
चाकरमान्यांना मोठा फटका
हा बिघाड ऐन कामाच्या वेळेत झाल्यामुळे चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. सध्या विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपरसह अनेक स्टेशन्सवर गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक लोकल प्लॅटफॉर्मवर आणि ट्रॅकवर एकामागून एक थांबल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने अनेक प्रवाशांनी कामावर पोहोचण्यासाठी ऑटो-टॅक्सी किंवा बेस्ट बसने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. यामुळे स्टेशनबाहेरील रस्त्यांवरही प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले
दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. या तांत्रिक अडथळ्यामुळे मध्य रेल्वेने लोकल सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. हे बिघाड दूर करण्याच्या कालावधीत माटुंगा स्टेशनपासून डाऊन स्लो लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे स्लो मार्गावरील स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. तसेच स्लो लोकल गाड्या जलद मार्गावर आल्यामुळे जलद गाड्यांच्या वेळापत्रकावरही थेट परिणाम झाल्याचे दिसत आहे. यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि ठाणे, कल्याण दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील गाड्या किमान २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.
