Mumbai Local Shocker Video : मुंबईच्या लोकलमध्ये बाईला मारण्यासाठी बेल्टच काढला, मारलं… बघा लोकांनी काय केलं?
मुंबई लोकल सध्या प्रवासासाठी नव्हे, तर वाढत्या भांडणे, हिंसाचार आणि मारामारीसाठी चर्चेत आहे. मागील महिन्यात झालेल्या हत्येपासून ते नुकत्याच एका महिलेवर झालेल्या हल्ल्यापर्यंत, अनेक घटनांनी प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणली आहे. सहप्रवाशांची उदासीनता चिंतेचा विषय बनली असून, तातडीने कठोर उपाययोजनांची गरज आहे.

मुंबई लोकलमध्ये घडलेल्या एका प्रकाराची मुंबईत दिवसभर चर्चा आहे. मुंबई लोकलमधला एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. एक व्यक्ती आणि एक महिला यांच्या वादाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत ती व्यक्ती वारंवार त्या महिलेला धमकावताना, शिवीगाळ करताना दिसत आहे. ही महिला खिडकीच्या शेजारी बसलेली दिसत आहे. तिच्या समोर तीन पोलीस आणि बाजूला दोन पुरुष आहेत. हा पुरुष त्या महिलेच्या समोर येऊन तिला धमकावतो, शिवी देतो आणि त्यानंतर तिच्या कानाखाली मारतो. विशेष म्हणजे त्या महिलेल्या बाजूला दोन तरुण आहेत. हे तरुण काहीच करताना दिसत नाहीये. महिला वारंवार त्याचा प्रतिकार करताना दिसत आहे. हे सर्व घडत असताना तो व्यक्ती दरवाजाकडे जातो. दरम्यान, ती महिला त्याला काही तरी बोलताना दिसत आहे. तो पुन्हा तिच्यापर्यंत परत येतो आणि दिवसाढवळ्या लोकलमध्ये बेल्ट काढतो. एवढा सर्व प्रकार घडत असताना इतर लोक काहीच प्रतिक्रिया देत नाहीत.
व्हिडिओ पाहिल्यावर असं वाटतं की आता तो तिला मारणार आहे. आजूबाजूचे प्रवासी हा प्रकार केवळ बघ्यासारखे बघत आहेत. दरम्यान, दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती या संपूर्ण प्रकाराचं व्हिडिओ चित्रीकरण करतो. मात्र, कुणीही समोर येऊन त्या व्यक्तीला अडवत नाही. घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ पाहिल्यावर कळतं त्या व्यक्तीने त्या महिलेला मारलं, मारण्यासाठी सर्वांच्या समोर दिवसाढवळ्या बेल्टही काढला. एका व्यक्तीने ही घटना घडत असताना व्हिडीओही काढला. पण या वादात कोणीही पडलं नाही. सर्व फक्त बघ्यासारखे बघत राहिले. या व्हिडिओची तुफान चर्चा सध्या मुंबईत आहेत. याचं कारण आहे, गेल्या दोन महिन्यात मुंबई लोकलमध्ये अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या. ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाले.
मुंबईतील घटनांवर चिंता
एक महिन्यापूर्वी नालासोपारा ते चर्चगेट रेल्वेमध्ये बोरिवली येथे मयांक लोहार नावाच्या तरुण मुलाचा भर लोकलमध्ये सर्वांच्यासमोर चाकूने हत्या करण्यात आली होती. मयांक हा कुटुंबाचा एकूलता एक होता. मुसळधार पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला होता. हत्या केल्यानंतर आरोपी बोरिवलीला उतरून आरामात गेला होता. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून या आरोपीला अटक केली होती.
दरम्यान, मुंबईतील एका स्टेशनवर एक व्यक्ती तलवार नाचवतानाही दिसला होता. त्यावेळीही प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली होती. अशा घटनांच्यावेळी लोक बघ्याची भूमिका घेत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशा घटना घडल्यानंतर लोकांनी समोर आलं पाहिजे. लोकांनी बघ्याची भूमिका घेऊ नये. हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. मात्र, नागरिक असं करताना दिसत नाही. प्रवाशांनी आता या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे.
प्रवाशांची उदासीनता चिंताजनक
या घटनेमुळे केवळ मारहाणीचा प्रकारच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या अशा घटनांमध्ये प्रवाशांकडून दाखवण्यात येणाऱ्या उदासीनतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. संकटात असलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी पुढे येण्याऐवजी अनेक प्रवासी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवर काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये जे हत्याकांड झालं, तेव्हाही कोणीच पुढे आलं नव्हतं, त्यामुळे अवघ्या विशीतल्या तरूणाला जीव गमावावा लागला होता.
मात्र, हा प्रकार नेमका कोणत्या मार्गावरील किंवा कोणत्या लोकल ट्रेनमध्ये घडला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. संबंधित प्रवाशाची ओळख पटवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
