मुंबईत 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार, भोंदूबाबाला अटक

'तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे, एखादा शुद्ध पुजारीच हा आत्मा बाहेर काढू शकेल', असं सांगून आरोपीने गायिकेवर बलात्कार केला

मुंबईत 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार, भोंदूबाबाला अटक

मुंबई : समृद्धी आणि व्यवसायवृद्धीसाठी घरात पूजा करण्याच्या बहाण्याने 21 वर्षीय गायिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार (Mumbai Pandit Rapes Singer) मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी भोंदूबाबा अटक केली आहे.

‘तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे, एखादा शुद्ध पुजारीच हा आत्मा बाहेर काढू शकेल’, असं सांगून आरोपीने तरुण गायिकेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

घडलेला प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे पीडित तरुणीने दुसऱ्या दिवशी आपल्या पतीला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर दोघांनी चारकोप पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून मंगळवारी कोर्टासमोर हजर केलं. कोर्टाने आरोपी भोंदूबाबाला पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार महिला रिमिक्स अल्बम गायिका आहे. ती चारकोप परिसरात संगीतकार पतीसह भाड्याच्या घरात राहते. आरोपी उमेश रमाशंकर पांडे हासुद्धा चारकोपचाच रहिवासी आहे.

हेही वाचा : स्टेशनकडे चालत निघालेल्या महिलेवर झुडपात नेऊन गँगरेप, कुर्ल्यातील थरारक घटना, सर्व आरोपींना बारा तासात बेड्या

पीडिता आणि तिचा पती काही महिन्यांपूर्वी गृहप्रवेशाच्या पूजेसाठी ज्योतिषाच्या शोधात होते. व्यावसायिक पातळी फारशी भरभराट नसल्याने दोघांनी एका मित्राची मदत मागितली होती. तेव्हा, समृद्धी आणि व्यवसायवृद्धीसाठी घरात होमहवन करण्याचा सल्ला त्यांना मिळाला. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपी उमेश पांडेशी दोघांची ओळख झाली.

पीडिता आणि तिच्या पतीने रविवारी पांडेला पूजेसाठी घरात बोलावलं. पूजेचं साहित्य आणण्यासाठी पती बाहेर गेला. तेव्हा, ‘तुझ्या शरीरात एक अपवित्र आत्मा आहे, त्यामुळे तुला व्यावसायिकदृष्ट्या अपयश येत आहे. शरीरातील अपवित्र आत्मा बाहेर काढण्यासाठी तुला नग्न व्हावं लागेल’ असं आरोपीने पीडितेला सांगितलं.

अपवित्र आत्मा काढण्यासाठी आपल्यासोबत झोपण्यास आरोपीने पीडितेला भाग पाडलं. हा प्रकार सुरु असतानाच काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव तिला झाली आणि तिने त्याला घराबाहेर जाण्यास सांगितलं. घाबरलेली असल्याने तिने दुसऱ्या दिवशी पतीला याविषयी सांगितलं. त्यानंतर दोघांनी चारकोप पोलिसात तक्रार (Mumbai Pandit Rapes Singer) दाखल केली.