मुंबईच्या नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ल्याची धमकी; पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आल्यानं खळबळ
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी एका व्यक्तीने दिली. संबंधित व्यक्तीने त्याचं नाव जहांगीर शेख असल्याचंही म्हटलंय.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याचं कळतंय. नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव जहांगीर शेख असल्याचंही सांगितलं आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. धमकीच्या फोननंतर नेव्हल डॉक परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं गेलं. पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अशा पद्धतीचे धमकीचे निनावी फोन सातत्याने येत असतात. याआधी पोलिसांना असे फोन अनेकदा आले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तीविरोधा गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई केली होती. याप्रकरणी काही जणांना अटकसुद्धा करण्यात आली होती.
नेव्हल डॉक परिसरात सर्च ऑपरेशन राबविल्यानंतर काही संशयास्पद आढळलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र सतर्कता म्हणून पोलिसांनी या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ दहशतवादी स्फोट झाला होता. एका कारमध्ये हा स्फोट झाला आणि त्यात 13 जणांनी आपले प्राण गमावले होते. त्यानंतर देशातील महत्त्वाच्या शहरांना हाय अलर्ट दिला होता. प्रमुख शहरांमधील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर हा धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं.
दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांना तातडीने अलर्ट जारी करण्यात आला. संवेदनशील परिसरात प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्या आल्या.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ 10 नोव्हेंबरला i20 कारचा स्फोट झाला. या स्फोटात 13 जण ठार झाले तर 25 हून अधिक जण जखमी झाले. ज्या कारचा स्फोट झाला, ती कार उमर नबी हा दहशतवादी चालवत होता अशी माहिती समोर आली. फॉरेन्सिक चाचणीच्या आधारे तपास यंत्रणांनी ही माहिती दिली. स्फोटातील कार जवळपास नष्ट झाली. त्यानंतर तपास यंत्रणांना एक पाय आणि काळ बूट सापडला. त्याची फॉरेन्सिक चाचणी झाल्यानंतर ती कार उमर नबीच चालवत होता, याची पुष्टी करण्यात आली.
