मुंबईकरांसाठी गुडन्यूज… पाऊस सुरू होताच पहिला तलाव भरला; उद्योग क्षेत्रालाही फायदा
मुंबईत मुसळधार पावसामुळे पवई तलाव पूर्ण भरला आहे. हा तलाव औद्योगिक वापरासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होईल. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे तो भरला आहे.

सध्या मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत २४ तासांच्या कालावधीत मुंबईतील सर्वच भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज समोर आली आहे. मुंबईतील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव पूर्णपणे भरला आहे. या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसले तरी प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरात येते. त्यामुळे याचा उद्योग क्षेत्राला फायदा होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज पहाटे ६ सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. मागील दोन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती
√ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
√ या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले.
√ या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर आहे. हा तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
√ तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५४५५ दशलक्ष लीटर)
√ हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.
√ गतवर्षी हा तलाव दिनांक ८ जुलै २०२४ रोजी भरून वाहू लागला होता.
अंबरनाथ, इगतपुरीत मध्यरात्रीपासून कोसळधारा
दरम्यान अंबरनाथ शहरात पावसाने अवघ्या दहा मिनिटांतच रस्ते जलमय केले आहेत. अंबरनाथ स्टेशन रोडवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर नागरिक साचलेल्या पाण्यातून वाट काढत आहेत. तसेच इगतपुरी शहरात मध्यरात्रीपासून पावसाच्या कोसळधारा सुरू आहेत. जोरदार हवेसह मुसळधार पाऊस पडत असून पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस अशाच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.
तसेच सिंधुदुर्ग कुडाळ तालुक्यातील नारूर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हातेरी नदीला आलेल्या पुरामुळे हा प्रकार घडला असून, दोन दिवसांपूर्वी सह्याद्री पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता. यामुळे ५० ते ६० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. लोकप्रतिनिधींनी तात्काळ पाहणी करून रस्ता मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
