शिक्षिका की हैवान? तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्याचा हात जळत्या मेणबत्तीवर धरला अन्… पुढे जे घडलं ते भयानक कृत्य पाहून हादराल
मालाडमधील एका शिक्षिकेने ८ वर्षांच्या मुलाच्या हाताला जळत्या मेणबत्तीने भाजल्यामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाचे हस्ताक्षर खराब असल्याने शिक्षिकेने ही शिक्षा दिली. या अमानुष कृत्यामुळे मुलाचा हात भाजला आहे

हस्ताक्षर खराब असल्याच्या कारणावरून मालाडमधील एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने तिसरीत शिकणाऱ्या एका ८ वर्षांच्या मुलाच्या हाताला जळत्या मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अमानुष कृत्यामुळे त्या मुलाचा हात भाजला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
काय आहे नेमकी घटना?
मुस्तकिन खान (५०) हे मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा येथे राहतात. त्यांचा मुलगा मोहम्मद हमजा खान (८) हा इयत्ता तिसरीत शिकतो. हमजा दररोज संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मालाडच्या गोकुलधाम येथील जेपी डेक्स इमारतीमधील शिक्षिका राजश्री राठोड यांच्याकडे शिकवणीला जात होता. २८ जुलै रोजी संध्याकाळी शिकवणी संपल्यानंतर राजश्री राठोड यांनी हमजाच्या वडिलांना फोन करून हमजा खूप रडत असल्याचे सांगितले. त्याला त्वरित घरी घेऊन जा, असेही त्या शिक्षिकेने सांगितले.
हमजाची मोठी बहीण रुबीना त्याला घेण्यासाठी गेली असता, हमजा खूप रडत होता. त्याच्या उजव्या हातावर भाजल्याच्या गंभीर जखमा दिसत होत्या. रुबीनाने याबद्दल विचारले असता, शिक्षिका राठोड यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. घरी परतल्यावर हमजाने वडिलांना सांगितले की, हस्ताक्षर खराब असल्यामुळे शिक्षिकेने शिक्षा म्हणून माझा हात जळत्या मेणबत्तीवर धरला. या घटनेबद्दल मुस्तकिन खान यांनी राठोड यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा राठोड यांनी मुलांना शिस्त लावण्यासाठी असे केल्याचे मान्य केले. खान यांनी अशा अमानुष शिक्षेबद्दल जाब विचारताच राठोड यांनी त्यांना शिवीगाळ केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पुढील तपास सुरु
या प्रकरणी मुलावर कांदिवलीतीली डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. यानंतर, मुस्तकिन खान यांनी कुरार पोलीस ठाण्यात राजश्री राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ च्या कलम ७५ सह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
