दुष्काळातही मुंबईला पाणी कमी नाही पडणार, मुंबईकरांसाठी गुडन्यूज, सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, दुष्काळातही आता मुंबईला पाण्याची कमतरता भासणार नाहीये. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात यंदा मान्सूनच्या पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि संपूर्ण जुलै महिना राज्यात पावसाचं प्रमाण चांगलं राहिलं. मात्र त्यानंतर राज्यात पाऊसच झाला नाही. पावसाभावी राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पाऊस न झाल्याने यंदा राज्यभरात पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. अनेक प्रकल्पांमधील पाणीपातळी खालावली आहे. दरम्यान पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी आता सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे दुष्काळातही मुंबईकरांना पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासणार नाहीये.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये मुंबईला पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पिण्यासाठी 81 टीएमसी पिण्याचे पाणी आरक्षित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. जरी 81 टीएमसी पिण्याचे पाणी आरक्षित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी देखील पाणी जपून वापरावं असं आवाहनही यावेळी गिरीश महाजन यांनी केलं आहे.
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एकूण 24 प्रकल्प आहेत. या 24 प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 103 टीएमसी एवढी आहे. त्यापैकी 81 टीएमसी पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित झालेले आहे. पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता नवीन 12 प्रकल्प हे मुंबई महानगर क्षेत्राकरिता प्रस्तावित आहेत. यामध्ये जलसंपदा विभागाचे 9, मुंबई महापालिकेचे 2 व सिडको विभागाच्या 1 प्रकल्पाचा समावेश आहे. याद्वारे सुमारे 80 टीएमसी पाणी नव्याने उपलब्ध होणार आहे.
यामध्ये BMC कडील पिंजाळ 14 टीएमसी, गारगाई 8 टीएमसी असून जलसंपदा विभागाचे शाई प्रकल्प 12 टीएमसी, काळू प्रकल्प 14 टीएमसी, बाळगंगा 6 टीएमसी, कोंढाणे 4 टीएमसी, पोशीर 10 टीएमसी, शेलार 6 टीएमसी तसेच 6 टीएमसीचे खोलसापाडा, देहरजी, सुसरी अशा नवीन एकूण 12 प्रकल्पांमधून 80 टीएमसी पाणी साठा उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे सरकारने आता 81 टीएमसी पिण्याचे पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
