मुंबईकरांसाठी पहिलो गोड बातमी… चिंतेचे ढग दूर, विहार तलाव ओसंडून वाहतोय
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीटंचाईची चिंता आता दूर झाली आहे, कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव आज रात्री ९ वाजता पूर्ण भरून ओसंडून वाहत आहे. जोरदार पावसामुळे हे शक्य झाले असून, मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर भीषण पाणी टंचाईचे ढग जमा झाले होते. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती. पण हे चिंतेचे ढग आता दूर झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला विहार तलाव दुथडी भरून वाहू लागला आहे. आज रात्री 9 वाजताच तलाव भरला. तलाव क्षेत्र परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने हा तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अजून मुंबईला पाणीपुरवठा करणारे सहा तलाव भरायचे बाकी आहेत. या तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस असून हे तलावही लवकरच भरतील अशी मुंबईकरांना आशा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी एक असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ आज दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. हा तलाव गेल्यावर्षी दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता.
२७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०२४ मध्ये दिनांक २५ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष २०२३ मध्ये दिनांक २६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.
बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा दोन सर्वात लहान तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. सन १८५९ मध्ये ६५ लाख रुपये खर्चून विहार तलाव बांधण्यात आला आहे.
विहार तलावाची संक्षिप्त माहिती…
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.
या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.
तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर अर्थात २,७६९.८० कोटी लिटर एवढा असतो.
हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.