‘मास्क’चा वापर टाळणाऱ्या 22 हजार 976 नागरिकांना एका दिवसात तब्बल 46 लाख रुपयांचा दंड

सोमवारी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृहासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:52 PM, 23 Feb 2021
'मास्क'चा वापर टाळणाऱ्या 22 हजार 976 नागरिकांना एका दिवसात तब्बल 46 लाख रुपयांचा दंड

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘विना मास्क’ आढळून येणा-या नागरिकांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे. तसे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात सोमवारी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृहासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली.(A fine of Rs 46 lakh a day was levied on those who avoided the use of masks)

BMC, पोलीस आणि रेल्वे विभागाची कारवाई

या कारवाईत कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठा दंड वसूल करण्यात आला. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे 14 हजार 606 व्यक्तिंवर, मुंबई पोलिस दलाद्वारे 7 हजार 911 व्यक्तींवर, मध्य रेल्वेद्वारे 238 व्यक्तींवर, पश्चिम रेल्वेद्वारे 221 व्यक्तींवर अशी एकूण 22 हज़ार 976 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येक रुपये 200 यानुसार तब्बल 45 लाख 95 हजार 200 रुपये एवढी दंड वसुली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाई करण्यात येत आहे.

कोणत्या विभागात किती लोकांवर कारवाई?

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान महापालिकेच्या 24 विभागांपैकी ‘एल’ विभागात सर्वाधिक म्हणजे 875 व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 75 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. या खालोखाल ‘आर मध्य’ विभागात 819 व्यक्तिंकडून 1 लाख 63 हजार 800 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

9 एप्रिल 2020 पासून कारवाई मोहीम

‘कोविड – 20’ च्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने चेहऱ्यावर ‘मास्क’ लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ‘मास्क’चा वापर न करणाऱ्या नागरिकांवर 200 रुपये एवढी दंड आकारणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेद्वारे ‘मास्क’ वापरण्या विषयक जनजागृती करण्यासोबतच नियम न पाळणाऱ्या किंवा चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई 9 एप्रिल 2020 पासून नियमितपणे करण्यात येत आहे.

मास्क वापरा, कोरोना टाळा

नागरिकांनी ‘फेस-मास्क’ वापरावा, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. पण ‘मास्क’चा वापर टाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जनजागृती आणि दंडात्मक कारवाई या दोन्ही बाबींमुळे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होत आहे. परिणामी, कोरोनाला आळा घालण्यासही मदत होत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी घराबाहेर पडताना ‘फेस-मास्क’ घालूनच बाहेर पडावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

वर्षभर कोरोनाविरुद्ध लढलो, आता पुन्हा लढाईचे दिवस- पोलीस महासंचालक

मास्क न घालणाऱ्या पुणेकरांना धडा, पोलिसांची 2 लाख 28 हजार जणांवर कारवाई

A fine of Rs 46 lakh a day was levied on those who avoided the use of masks