‘आधी मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडा, मग भाजपवर बोला’, आदित्य ठाकरेंना राणेंचा टोला

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'आधी मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडा, मग भाजपवर बोला', आदित्य ठाकरेंना राणेंचा टोला

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आदित्य यांनी भाजपला शिकवायची गरज नाही. भाजपमध्ये शिकलेली लोक आहेत. आदित्य ठाकरेंना कायदा काय आहे ते माहित नाही. त्यांनी अगोदर मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडावी. त्यामध्ये काही कळतं का ते बघावे, नंतर भाजपवर बोलावे”, असा चिमटा नारायण राणे यांनी काढला.

मनसे आणि भाजप यांच्या युतीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडी बघता राज्यात कोणताही राजकीय भूकंप घडू शकतो, असे बोलले जात आहे. याबाबत भाजपचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना प्रश्न विचारला असता राणे यांनी या विषयावर बोलणे टाळले. “मनसे आणि भाजप युतीबाबत मी बोलणार नाही तर पक्षाचे प्रमुख बोलतील”, असे नारायण राणे म्हणाले. याशिवाय या सरकारला कायमची सत्ता दिलेली नसून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्वास नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केला.

नारायण राणे यांनी राज्य सरकारने केलेल्या दोन लाख रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित केले. “राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली खरी, मात्र  कर्जमाफीच्या जीआरमध्ये अंमलबजावणीच्या तारेखचा उल्लेख नाही. त्यामुळे कर्जमाफी कधी मिळेल हे सांगता येणार नाही”, असे नारायण राणे म्हणाले.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने भाजपसोबत न जाता राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, “भाजप कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वत: आली होती. केंद्रात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजपला कुणाचीही फिकीर नाही. खरतर काळजी करण्याची गरज त्यांना आहे. कारण त्यांचे 54 पैकी 35 आमदार नाराज आहेत”, असे नारायण राणे म्हणाले.

“मी कोणावर नाराज नाही. मला या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. हे सरकार अपेक्षा पूर्ण करु शकत नाही कारण या सरकारला सिरीयस बेस नाही. या सरकारला राज्याचे प्रशासन आणि विकास कसा करायचा ते माहित नाही. अशा माणसाच्या हातात सत्ता गेल्याने त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायची? या सरकारवर कोण नाराज आहे ते तुम्ही शोधा”, असे नारायण राणे म्हणाले.

Published On - 8:44 am, Sun, 12 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI