नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड, समीर खान यांच्या घरी सर्च ऑपरेशन

ब्रिटिश नागरिक असलेला ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. (Samir Khan Residence NCB raid)

नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड, समीर खान यांच्या घरी सर्च ऑपरेशन

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Samir Khan) यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. खान यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने धाड टाकली. समीर खान यांच्या घरात एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. (Nawab Malik son in law Samir Khan Residence NCB raid)

ब्रिटिश नागरिक असलेला ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार करण सजनानी आणि समीर खान या दोघांमध्ये ड्रग्जबाबत झालेले चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे सापडले आहेत.

समीर खान रडारवर का?

समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पे द्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे.

मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु असताना हा व्यवहार समोर आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. या प्रकरणी काल (बुधवार) सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. संध्याकाळी समीर खान यांना एनसीबीने अटक केली.

“समीर खान आणि करण सजनानी यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार किरकोळ नसून मोठ्या रकमेचे आहेत. शिवाय समीर खानने ड्रग्स सेवन केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याआधारे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली” अशी माहिती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली.

करण सजनानी कोण आहे?

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणी केम्प्स कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यांनाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडले गेल्याचा आरोप आहे. (Nawab Malik son in law Samir Khan Residence NCB raid)

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी

नवाब मलिक यांचे जावई आणि ‘ड्रग्जचा लॉर्ड’ समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. आता मलिक यांनी ठाकरे सरकारमधून पायउतार व्हावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

नवाब मलिक यांच्या जावयाकडून ड्रग्ज सेवन, आमच्याकडे पुरावे, एनसीबी अधिकाऱ्याचा दावा

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक; एनसीबीकडून 10 तास कसून चौकशी

(Nawab Malik son in law Samir Khan Residence NCB raid)

Published On - 8:58 am, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI