राज ठाकरे आघाडीत या, अजित पवारांची हाक

राज ठाकरे आघाडीत या, अजित पवारांची हाक

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेने समविचारी पक्ष म्हणून आघाडीसोबत यावं, असं जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. त्याबाबत अजित पवार म्हणाले, “मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आलं पाहिजे. मनसेने गेल्यावेळी एक लाख मतं घेतली होती. माझं वैयक्तिक मत आहे की एकत्र आले पाहिजे”

अजित पवार यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केल्याने मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

एकीकडे अजित पवार यांनी मनसेने आघाडीत येण्याबाबतचं वक्तव्य केलं असलं, तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मनसेसोबत आघाडीबाबत कोणतीही चर्चा नसल्याचं म्हटलं होतं. त्यातच काँग्रेसही मनसेला आघाडीत घेण्यासाठी इच्छुक नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी-युतीचं राजकारण जोर धरत आहे.

भुजबळही पॉझिटिव्ह

याआधी छगन भुजबळ यांनीही राज ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती.  छगन भुजबळ यांनी राज ठाकरे आघाडीसोबत आल्यास फायदाच होईल, असं मत व्यक्त केलं होतं.  भुजबळ म्हणाले होते, “राज ठाकरे यांच्याशी जागावाटपबाबत काही चर्चा सुरु आहे की नाही याबाबतची माहिती मला नाही. मात्र राज ठाकरे आघाडीसोबत आल्यास त्याचा फायदाच होईल. आम्हाला एक एक मताची गरज असताना, राज ठाकरे यांच्या मागे तर हजारो मते आहेत. ते मोदी सरकारच्याविरोधात असल्याने त्यांचा फायदाच होईल”

वाचा – राज ठाकरेंकडे हजारो मतं, फायदाच होईल: छगन भुजबळ

मनसेला मुंबईत एक जागा देण्याची यापूर्वीची चर्चा

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करुन येत्या लोकसभा निवडणुकींना सामोरं जाणार आहेत, हे एव्हाना निश्चित झाले आहे. या आघाडीत आता इतर मित्रपक्ष जोडण्यासही सुरुवात झाल्याचे दिसते आहे. त्यातूनच राज ठाकरे यांच्या मनसेचा पर्याय पुढे येत आहे.

मनसेला आघाडीच्या कोट्यातून मुंबईत  लोकसभेसाठी एक जागा देण्याची चर्चा सुरु झाली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा मनसेला द्यावी आणि इतर ठिकाणी त्यांची मदत घ्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला आहे. मात्र, या प्रस्तावाला काँग्रेसने नकार दिला आहे.

मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध का?

उत्तर भारतीयांचा कट्टर विरोधक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसला देशातील हिंदी पट्ट्यात मोठा फटका बसू शकतो. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमधील जनतेच्या रोषाला काँग्रेसला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

Published On - 3:03 pm, Tue, 12 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI