‘काही जणांना जास्त बोललं की आपलं महत्त्व वाढेल असं वाटतं’, नवाब मलिकांचा नसीम खान यांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्वबळाची भाषा करत आघाडीवर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या काँग्रेसचे नेते नसीम खान यांच्यावर सडकून टीका केलीय.

'काही जणांना जास्त बोललं की आपलं महत्त्व वाढेल असं वाटतं', नवाब मलिकांचा नसीम खान यांना टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्वबळाची भाषा करत आघाडीवर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या काँग्रेसचे नेते नसीम खान यांच्यावर सडकून टीका केलीय. सरकार चालवणं सर्वांची जबाबदारी आहे. पक्षात आपली ताकद आहे असा आव आणत आपलं महत्त्व वाढवण्यासाठी काही वक्तव्यं होत आहेत, असं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पक्षांतर्गत वादाचा आघाडीशी काही संबंध नाही, असंही नमूद केलं (NCP leader Nawab Malik criticize Congress leader Naseem Khan).

नवाब मलिक म्हणाले, “आगामी कोणतीही निवडणूक असेल ती महाविकास आघाडीने एकत्रित लढली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. आपल्याला एक संघ निवडणूक लढवायची आहे, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील तोच आग्रह धरला आहे. काँग्रेसची अंतर्गत काही चर्चा होत असेल आणि त्यांची वेगळी भूमिका असेल तर त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. सध्या अधिकृतपणे महाविकासआघाडीने कोणतीही भूमिका मांडलेली नाही.”

‘काही जणांना जास्त बोललं की आपलं महत्त्व वाढेल असं वाटतं’

नवाब मलिक यांनी काँग्रेस नेते नसीम खान यांच्या वक्तव्यांचाही चांगलाच समाचार घेतला. “कोणत्याही पक्षाचा काही अंतर्गत वाद असेल, तर त्यांना चर्चा करण्याचा अधिकार आहे. आमचं एकच मत आहे, आम्ही भाजपच्या विरोधात सर्वांना आणून सरकार निर्माण केलं आहे. सरकार चालवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. कोणाचा पक्षांतर्गत वाद असेल आणि आपलं महत्त्व कमी आहे असं वाटत असेल तर काही जणांना जास्त बोललं की आपलं महत्त्व वाढेल, असं वाटतं. त्याचा महाविकासआघाडीशी काही संबंध नाही,” अशी भूमिका नवाब मलिक यांनी व्यक्त केली. तसेच पक्षाबद्दल बोलताना पक्षातील नेत्यांना विचारा, असाही सल्ला त्यांनी नसीम खान यांना दिला.

‘कार्यकर्ते पक्ष का सोडतात याचा त्या त्या पक्षाने विचार करायला हवा’

नवाब मलिक म्हणाले, “कुठला कार्यकर्ता कोणत्या पक्षात जातो त्याचे कारण काय आहे हे प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे. जर कार्यकर्ते एखाद्या पक्षात टिकत नसतील तर त्याची कारणे काय आहेत, लोकं पक्ष का सोडत आहेत याचा कुठेतरी विचार त्या पक्षाने करायला हवा.”

‘समन्वय समितीकडे तक्रार न करता बाहेर वक्तव्य करणारे पक्षात आपली ताकद असल्याचा आव आणत आहेत’

नवाब मलिक यांनी काँग्रेस आमदारांना निधी नाही यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “समन्वय समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन मंत्री आहेत. त्यांच्या काही तक्रारी असतील, तर तिकडे त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. जे कोणी अशा समस्या मांडत आहेत ते पक्षात आपली ताकद असल्याचा आव आणत आहेत. सरकार चालवणं ही त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे. सरकार व्यवस्थित चालत आहे. त्यामुळे याला गंभीरतेने पाहण्याची गरज नाही.”

‘आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर’

“महाराष्ट्रात गेल्या काही काळात जे कोणी भाजपच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेईल त्याच्याविरोधात कुठेतरी ईडीचा वापर होत आहे. हे जगजाहीर झाले आहे. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडी नोटीस येण्याच्या आधीच त्याची बातमी बाहेर आली. ज्यांना ज्यांना नोटीस गेले त्यांचं पुढे काय झालं हे सांगता आलेलं नाही. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी अशा कारवाया केल्या जातात. ईडीचा वापर झाला तरी महाराष्ट्रात या कारवाईला लोक घाबरले नाहीत. आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर होतोय.”

हेही वाचा :

तेव्हा पवारांना पाठवलेली नोटीस मागे का घेतली?: राष्ट्रवादी

‘केंद्र सरकार अडचणीत येतं, तेव्हाच मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकतात’

राज्य सरकार तरुणांना 10 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य करणार, मंत्री नवाब मलिक यांची मोठी घोषणा

NCP leader Nawab Malik criticize Congress leader Naseem Khan

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI