
मराठा आरक्षणावरून राज्यात ओबीसी नेते आक्रमक दिसत आहेत. 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या मराठा-कुणबी शासन निर्णयाविरोधात ओबीसी नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत. यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी आग्रही भूमिका घेतल्यानंतर इतर ओबीसी नेत्यांनीही राज्यात मोर्चाचा बार उडवला आहे. तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल चढवला. त्यांनी जरांगेंवर टीकेमागील कारणही स्पष्ट केले. त्याविषयीची बाजू त्यांनी मांडली.
भुजबळांनी 2 सप्टेंबर रोजीच्या जीआरला पुन्हा विरोध दर्शवला. नाही म्हणता मग इतके लोक घुसवता कशी असा सवाल त्यांनी केला. भुजबळांनी राज्यातील ओबीसी आंदोलनाच्या घडामोडींवरही भाष्य केले. ओबीसी समाजात एकवाक्यता दिसत नाही असा जो सूर उमटत आहे, त्यावर त्यांनी मत व्यक्त केले. ओबीसी समाजात 300 हून अधिक जाती आहेत. त्यांचे नेते आणि नवीन दमाच्या संघटना या अन्यायाविरोधात त्यांच्या परीने आवाज उठवत असल्याचे आणि सर्वच नेते या जीआरविरोधात असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.
मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल
मनोज जरांगे हे सो कोल्ड मराठा समाजाचे नेते आहेत, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या शिवराळ भाषा आणि वैयक्तिक टीकेमुळे आपण त्यांच्यावर बोलतो. त्यांच्यावर टीका करतो असे म्हणणे त्यांनी मांडले. हा माणूस कुणालाही काही बोलतो. सुसंस्कृतपणा त्यांच्यात नसल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला आपला विरोध नसल्याची बाजू ही त्यांनी मांडली.
अरे, कोण तू?
आपण मनोज जरांगेंवर कधी बोललोच नसतो. त्याच्या वाटेलाही गेलो नसतो. आम्ही न्यायालयीन लढाई लढली असती. पण हा माणूस सारखं सारखं, रोज रोज कधी मला बोलेले, कधी मुख्यमंत्र्यांना तर कधी उपमुख्यमंत्र्यांना बोलतो. काल काय तू राहुल गांधी यांना बोलला. दिल्लीतील लाल्या का काहीतरी बोलला. अरे, कोण तू? तुझा एक माणूस निवडून येऊ शकत नाही. तू उभा राहा बरं. आज काही नाही झालं तरी त्यांच्या हातात 2-3 राज्य आहेत. ते नेते आहेत. राहुल गांधींच्या घराण्यानं काहीतरी त्याग केलेला आहे. फडणवीस हे कार्यतत्पर आणि हुशार व्यक्ती आहेत. चांगल्या रितीने राज्य चालवत आहेत. त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतो. त्यांच्या पत्नीबद्दल काही तरी बोलतो. शिवीगाळ काय करतो. तुला काय कुणालाही काही बोलण्याचा परवाना दिला आहे का? असंस्कृतपणे वाटेल ते बोलशील.
माझ्याबाबतीत ही तो काहीही बोलला. यांना कुठे हॉलंड पाठवा, लंडनला पाठवा. हा असा असंस्कृत माणूस काहीही बोलतो आणि मराठा समाजाचे नेते ही त्याच्या पाठीमागे जातात. तेव्हा आम्हाला मोठं दुःख होतं. जेव्हा यशवंतराव चव्हाणांना विचारलं की हे राज्य मराठ्यांचं होणार की मराठीचं होणार, तेव्हा ते म्हणाले की हे राज्य मराठ्यांचं नाही तर मराठीचं होणार या मराठी राज्यात भटके विमूक्त, ओबीसी सगळे सगळे मराठी भाषिक आहेत. पण आता हे सर्व विसरलेले दिसत आहेत, अशी व्यथा भुजबळांनी मांडली.