Breaking : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळला

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.

Breaking : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळला
कोरोना विषाणू.

मुंबई : अखेर महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला आहे. कल्याण डोंबिवली (kalyan-Dombiwali) मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं (Health Department) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.

दरम्यान, देशातील सुरुवातीला कर्नाटकमध्ये दोन व्यक्तींना कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर आज गुजरातमध्येही एका वृद्ध व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं आता आढळून आलं आहे. कल्याण-डोंबिवलीमधील एका 33 वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. हा तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून मुंबईत आला होता. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. जिनोमि सिक्वेन्सिंगसाठी त्याचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर आज या तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे.

त्या तरुणाने कोरोना लस घेतलेली नाही!

ओमिक्रॉनची लागण झालेल्या तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. अन्य कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरुपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या 12 अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजन कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरुणाने दिलेली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. त्याचबरोबर अजून निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झालेला आहे. त्या रुग्णामध्ये ओमिक्रॉन आढळलेला नाही. तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणून आढळून आलेला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर RTPCR चाचणी

आज सकाळपर्यंत मुंबई आंततराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व 3 हजार 839 प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात आली आहे. इतर देशातून आलेल्या 17 हजार 107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील तपासणीत 1 डिसेंबरपासून आतापर्यंत 8 प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.

कोरोना नियम पाळण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेनं भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगिकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही’, जयंत पाटलांचा खोचक टोला

उत्तराखंडमध्ये 18 हजार कोटी रु प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी, 10 वर्षे काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केल्याची टीका

Published On - 7:31 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI