घाटकोपरमध्ये हिंदू सभा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा, 61 रुग्णांचे जीव टांगणीवर

घाटकोपरमध्ये हिंदू सभा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे (Oxygen shortage in Ghatkopar Hindu Sabha hospital).

चेतन पाटील

|

Apr 21, 2021 | 6:36 PM

मुंबई : घाटकोपरमध्ये हिंदू सभा रुग्णालयात (Hindu Sabha Hospital) ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे (Oxygen shortage). त्यामुळे 61 रुग्णांचे जीव टांगणीवर लागले आहेत. रुग्णालयाची ऑक्सिजनसाठी धावपळ सुरु झाली आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात आज सकाळपासून ऑक्सिजनचा साठा कमी आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरु आहे.  दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने संपर्क साधला तर ऑक्सिजन पुरवू, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे (Oxygen shortage in Ghatkopar Hindu Sabha hospital).

हिंदू सभा रुग्णालयाच्या डॉक्टरांची प्रतिक्रिया

“आक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्या दिवसाला एकदा, दोनदा किंवा रात्रीही ऑक्सिजन पुरवत आहेत. पण ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांकडेही सध्या ऑक्सिजन नाही. आमच्याकडे ऑक्सिजन आलं की आम्ही देऊ, असं ते सांगत आहेत. जेवढे ऑक्सिजन प्रोव्हायडर आहेत त्यांना वेळोवर ऑक्सिजन द्यावा, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. तसेच सगळ्या रुग्णालयांमध्ये बॅकअप सिलेंडरची समस्या येत आहे. त्यामुळे सरकारने रुग्णालयांमध्ये बॅकअप सिलेंडर बसवावा, असं कंपन्यांना सांगावं”, अशी प्रतिक्रिया हिंदू सभा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे (Oxygen shortage in Ghatkopar Hindu Sabha hospital).

अखेर संध्याकाळी ऑक्सिजन मिळालं

हिंदू सभा रुग्णालयाकडे संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन पुरवठा होता. याबाबत रुग्णालयाने राज्य सरकारला पाठवलेले पत्रही सोशल मीडियावर सकाळपासून व्हायरल झालं होतं. ऑक्सिजनसाठी रुग्णालय प्रशासनाची मोठी धमछाक झाली. याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने बातमी प्रदर्शित केली. या बातमीची दखल घेत अखेर संध्याकाळी रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवण्यात आलं.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळणं कठीण होऊन बसलं आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताणा आला आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवताना दिसत आहे. राज्यभरातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सध्या तुटवडा आहे. ऑक्सिजनचा साठा संपला तर रुग्णांचा जीवही जाऊ शकतो. याबाबत आज नाशिकमध्ये घडलेली घटना ताजी आहे.

नाशिकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्याने मोठी दुर्घटना

नाशिकमध्ये आज महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात मोठी दुर्घटना घडली. रुग्णालयाबाहेर असलेल्या ऑक्सिजन टँकर लीक झालं. त्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा थांबला. या दुर्घटनेमुळे तब्बल 22 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला.

अंबाजोगाईत ऑक्सिजनअभावी 5 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप

नाशिकच्या घटनेने राज्य सुन्न झालेलं असताना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिनच्या तुटवड्यामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केले आहेत. तर रुग्णालयाचे डीन शिवाजी शुक्रे यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी न झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

पाच दिवसांपूर्वी जळगावात ऑक्सिजन अभावी गुदमरुन महिलेचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यात 16 एप्रिल रोजी भयानक दृश्य बघायला मिळालं. जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपल्याने खळबळ उडाली. ऑक्सिजनचा साठा संपल्याने ऑक्सिजन प्रणालीवर असणाऱ्या 12 रुग्णांना तातडीने जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. या प्रक्रियेत रुग्णालयात पोहचण्याआधीच एका कोरोनाबाधित वृद्धेचा रस्त्यात रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत वृद्धेच्या संतप्त नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत संताप व्यक्त केला. या घटनेमुळे वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा किती हतबल झाली आहे, याचा प्रत्यय आला.

नालासोपाऱ्यातही दहा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

चार दिवसांपूर्वी मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नालासोपारा शहरातही अशीच काहीशी घटना घडल्याचं समोर आलं होतं. नालासोपाऱ्यात दोन रुग्णालयांमध्ये तब्बल दहा रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये सात तर रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये तीन रुग्णांचा अवघ्या काही तासातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आज जळगावात याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

ठाण्यात ऑक्सिजनचा साठा संपल्याने 26 रुग्णांना हलवले

नालासोपाऱ्यातील घटनेआधी ठाण्यात रविवारी (11 जानेवारी) ऑक्सिजनचा साठा संपल्याने तब्बल 26 रुग्णांना पार्किंग प्लाझा कोव्हिड सेंटरमधून ग्लोबल हॉस्पिटलला हलवण्यात आलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ठाण्याच्या याच कोविड सेंटरमध्ये चार दिवसांपूर्वी काही तास रुग्णांना पिण्यासाठी पाणी नसल्याची माहिती समोर आली आहे. पार्किंग प्लाझा येथील कोव्हिड सेंटरमध्ये बाथरुम आणि शौचालयासाठी देखील पाणी नसल्याची माहिती समोर आली होती.

संपूर्ण राज्यात रुग्णांची हेळसांड

राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. दररोज अर्ध्या लाखापेक्षा जास्त नागरीक कोरोनाबाधित होत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. काही ठिकाणी रुग्णांना साधा बेड मिळवण्यासाठी चार ते पाच दिवस वाट बघावी लागत आहे. काही ठिकाणी एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचार द्यावा लागत आहे. तर काही ठिकाणी जमीनीवर रुग्णांना झोपवून ऑक्सिजन दिला जातोय. काही भागांमध्ये प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचाच साठा कमी पडत आहे. त्यामुळे अक्षरक्ष: रुग्णांचा जीव जाताना दिसतोय. या घटना ऐकल्यावर अंगावर काट येतो. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा असाच वाढता राहीला तर यापेक्षाही आणखी विदारक परिस्थितीत उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

धक्कादायक ! नाशिकनंतर आता अंबाजोगाईमध्ये ऑक्सिजनचा अभाव, 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप

Nashik Oxygen Leak : नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न!,मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू

Nashik Oxygen Leak LIVE Updates: आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं- राज ठाकरे

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें