मुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड, 508 झाडं हटवण्याचा प्रस्ताव

आरे येथील मेट्रो कारशेडसाठी झाडांचा बळी दिल्यानंतर आता मेट्रो स्टेशन आणि मार्गात येणाऱ्या तब्बल 508 झाडांना हटवण्यात येणार आहेत.

मुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड, 508 झाडं हटवण्याचा प्रस्ताव

मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेडसाठी झाडांचा बळी दिल्यानंतर आता मेट्रो स्टेशन आणि मार्गात येणाऱ्या तब्बल 508 झाडांना हटवण्यात येणार आहेत (Tree Cutting For Mumbai Metro). यात 162 झाडे मुळापासून कापण्यात येणार असून 346 झाडे पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत. याचा प्रस्ताव शुक्रवारी (14 फेब्रुवारी) पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे वृक्षप्रेमी आणि मुंबईकरांचे लक्ष लागले आहे (Tree Cutting For Mumbai Metro).

भाजप-शिवसेना युतीच्या काळात आरे येथील मेट्रो कारशेडसाठी कापण्यात आलेल्या झाडांमुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधक आणि अशासकीय संस्था आक्रमक झाल्या होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरे वसाहतीमधील झाडे कापण्यास स्थगिती देण्यात आली होती.

आता पुन्हा एकदा मेट्रो प्रकल्पासाठी 508 झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

कुठे किती झाडे कापली जाणार?

-अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर ते ओशिवरा नाला दरम्यानच्या नियोजित मेट्रो लाईन 2-ए च्या बांधकामात अडथळा निर्माण करणारी 32 झाडे कापण्यात येणार असून 90 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

-त्याशिवाय, गोरेगाव पश्चिमेकडील मेट्रो 2-ए प्रकल्पाच्या गोरेगाव आणि बांगूरनगर स्टेशनच्या बांधकामात आडवी येणारी 29 झाडे कापणे आणि 85 झाडे पुनर्रोपीत करण्याची परवानगी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे मागण्यात आली आहे.

-कांदिवली पश्चिम येथील मेट्रो लाईन 2-ए च्या लालजीपाडा ते महावीरनगर दरम्यानच्या कामात अडथळा निर्माण करणारी 53 झाडे कापणे आणि 21 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

-दहिसर पूर्व ते डी. एन. नगर दरम्यानची 64 झाडे कापणे आणि 37 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

-लिंक रोड ते चारकोप कारशेड डेपो, अथर्व कॉलेजजवळ मालाड पश्चिम येथील 11 झाडे कापणे व 86 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

याबाबतचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. यावर चर्चा करून निर्णय घ्यायचा असल्यामुळे राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Published On - 9:10 am, Wed, 12 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI