मुंबईत 1 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्ती विरोधात आंदोलन, मेधा पाटकरांसह अनेकांना अटक

मुंबईत 1 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या सक्तीच्या निवृत्ती विरोधात आंदोलन, मेधा पाटकरांसह अनेकांना अटक

सक्तीच्या सेवानिवृत्तीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह आंदोलकांना मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 09, 2021 | 9:11 PM

मुंबई : सेंच्युरी मिलमधील 1 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सेवानिवृत्तीची (VRS) सक्ती करण्यात आलीय. या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह शेकडो कामगारांनी मुंबईतील बिर्ला भवन जवळील सेंच्युरी मिल येथे आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासह आंदोलकांना अटक केलीय. आंदोलकांना अटक करून दादर पोलीस स्टेशनवर नेण्यात आले आहे. दरम्यान, या अटकेचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) आणि श्रमिक जनता संघासह अनेक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कारवाईचा निषेध केलाय (Protest against compulsory VRS Mumbai Police arrest Medha Patkar and other workers).

कामगार नेते विश्वास उटगी म्हणाले, “बेकायदेशीर ऐच्छिक सेवानिवृत्तीची (VRS) सक्ती करणाऱ्या नोटीस विरोधात जाब मागण्यासाठी श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्षा मेधा पाटकर, सरचिटणीस जगदीश खैरालिया यांच्यासह शेकडो कर्मचारी मुंबईतील सेंच्युरी मुख्यालयासमोर आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह आंदोलकांना अटक केली आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. कामगार संघटना संयुक्त कृति समिती मेधा पाटकर यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहे. मेधा पाटकरांसह सर्व कामगारांची त्वरित सुटका करावी आणि कामगारांना न्याय द्यावा.”

“महाराष्ट्र सरकार सेंच्युरी मिल मालकांना कामगार विरोधी कृत्यासाठी अटक करण्याची हिंमत दाखविणार का? मुंबई पेालीसांनी तारतम्य गमावले आहे काय?” असे सवालही विश्वास उटगी यांनी केले.

“सरकार आणि कंपनीने कामगारांशी संवाद साधत सक्तीचं निवृत्ती धोरण मागे घ्यावं”

जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयने (NAPM) म्हटलं आहे, “सेंच्युरी मिलचे हजारो कामगार आपल्यावरील अन्यायाविरोधात मागील 44 महिन्याहूनही अधिक काळ शांततापूर्ण रीतीने संघर्ष करत आहेत. कंपनीने नुकत्याच केलेल्या 1 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर सक्तीची व्हीआरएस (ऐच्छिक सेवानिवृत्ती) घेण्याचं बेकायदेशीर धोरण आणलं गेलं. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आज (9 जुलै) मुंबईतील बिर्ला भवन येथील सेंचुरी मिलच्या कंपनी मुख्यालयात पोहोचले. मात्र, त्यानंतर लगेच त्यांना अटक करण्यात आली. आंदोलन करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र पोलिसांनी मनमानीपणे अटक केली आहे. सेंचुरी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा पाटकर, जगदीश खैरलिया आणि इतर कार्यकर्त्यांच्या मनमानी अटकेचा आम्ही निषेध करतो. सरकार आणि कंपनी व्यवस्थापनाने कामगारांशी संवाद साधावा आणि जबरदस्तीचे व्हीआरएस धोरण मागे घ्यावे.”

अटक झालेल्यांमध्ये अन्य अनेक महिला-पुरुष कर्मचाऱ्यांसह श्याम बधाने, संजय चौहान, हेमंत गोसावी हे सेंच्युरी मिल्समधील कर्मचारी कार्यकर्ते तसेच मेधा पाटकर (राष्ट्रीय संयोजक, एनएपीएम) आणि जगदीश खैरलिया (सचिव, श्रमिक जनता संघ) यांचा समावेश आहे. अटक केलेल्या या सर्वांना दादर पोलिस स्टेशन भवानी शंकर रोड येथे नेण्यात आले आहे.

“कोरोना नियम दाखवत आंदोलनाला विरोध, पोलीस गाडीत कोंबताना मात्र नियमांचं उल्लंघन”

एनएपीएमने म्हटलं, “एकीकडे प्रशासन कोविड नियमावली दाखवून कोणत्याही प्रकारचे विरोध प्रदर्शन करण्यास रोखत असताना दुसरीकडे, त्याच प्रोटोकॉलचे उल्लंघन करत अनेक महिला-पुरुष कामगारांना एकाच पोलिस व्हॅनमध्ये अक्षरशः ढकलले गेले, कोंबले गेले. हा अत्याचारच आहे. दरम्यान, सेन्चुरी मॅनेजमेंटद्वारे कामगारांवर लादल्या गेलेल्या बेकायदा व्हीआरएस विरोधात आणि महाराष्ट्र पोलिसांकडून दिल्या गेलेल्या अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ मेधाताई पाटकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.”

“सरकार व कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांशी चर्चा करावी व जबरदस्तीची स्वेच्छानिवृत्ती मागे घ्यावी. श्रमिकांचा रोजगाराचा अधिकार अबाधित राखावा. अषी मागणी एनएपीएमने केलीय.

व्हीआरएसची नोटीस मागे घेऊन कंपनी सूरू करण्याची आंदोलकांची मागणी

आंदोलनाविषयी माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते संजय मं. गो. म्हटले, “आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास सेंच्युरी भवनसमोर सेंच्युरी यार्न व डेनिम कंपनी, सत्राटी, इंदौर येथील श्रमिक पोहोचले. प्रशासनाने चर्चा करावी, व्हीआरएसची नोटीस मागे घ्यावी, कंपनी चालू करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी प्रशासन भेट द्यायला तयार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरेमठ यांनी दिली. तुम्ही शिष्टमंडळाने भेटायला जा. बाकी सर्वांना निघून जायला सांगा, असं सांगण्यात आलं.”

“पोलिसांनी महिलांना खेचून दमदाटी केली, कोरोनाच्या नियमांचंही उल्लंघन”

“आम्ही शिष्टमंडळ भेटून काय चर्चा होते ते लोकांना समजावून सांगणार आहोत. त्यासाठी सर्वांना काही वेळ इथं थांबू द्या, असं आम्ही सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी जबरदस्ती करत लोकांना अटक केली. पोलीस गाडीमध्ये कोंबून दादरच्या शैतान पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. आम्ही सर्वजण अंतर ठेवून बसलो होतो. पण पोलिसांनी महिलांना देखील खेचून दमदाटी करत पोलीस गाडीत कोंबले. कोरोनाचं कारण देत आम्हाला अटक करण्यात आली. आंदोलकांना पोलीस गाडीत आणताना कोरोनाचे नियम पाळले गेले नाही,” अशी माहिती संजय मं. गो. यांनी दिली.

हेही वाचा :

मुंबईत पाईपलाईन्सवर वास्तव्य करणारे लोक म्हणजे दहशतवादी नव्हेत: मेधा पाटकर

मोदी सरकार अंबानी-अदानीसाठी काम करतंय, पुढच्या निवडणुकीसाठी फंडची तयारी सुरु : मेधा पाटकर

कृषी कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही; तो मागेच घ्यावा लागेल: मेधा पाटकर

व्हिडीओ पाहा :

Protest against compulsory VRS Mumbai Police arrest Medha Patkar and other workers

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें