पदोन्नतीसह मुस्लिम आरक्षणासाठी आठवलेंचा एल्गार, उद्या आझाद मैदानात रिपाइंचं आंदोलन

वाढते दलित अत्याचार रोखण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात उद्या (6 जुलै) आझाद मैदानात निदर्शने आंदोलन केलं जाणार आहे.

पदोन्नतीसह मुस्लिम आरक्षणासाठी आठवलेंचा एल्गार, उद्या आझाद मैदानात रिपाइंचं आंदोलन
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jul 05, 2021 | 11:01 PM

मुंबई : पदोन्नती मधील आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण, बुलडाणा जिल्ह्यातील चितोडा गावात झालेला दलित कुटुंबावरील हल्याचा निषेध, राज्यातील वाढते दलित अत्याचार रोखण्याच्या मागणी सह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वात उद्या (6 जुलै) आझाद मैदानात निदर्शने आंदोलन अयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, हे आंदोलन केले जाईल. (Ramdas Athawale and RPI will protest for Muslim reservation, reservation in promotion at Azad Maidan)

अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा कायम पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकलेच पाहिजे. जोपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवाव्यात. तसेच मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावे. बुलडाणा जिल्हातील खामगाव तालुक्यात चितोडा गावातील हिवराळे या दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करुन राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखण्याच्या मागणीसाठी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे मंगळवारी (6 जुलै) दुपारी 1 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे, अशी माहिती गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आंदोलन सप्ताह

पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे 1 जून ते 7 जूनदरम्यान राज्यभर आंदोलन सप्ताह पाळण्यात आला. आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि आयोजक जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेले, ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल, दलित आदिवासी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण रोखण्यात आले आहे, त्यामुळे हे सरकार आरक्षण विरोधी सरकार आहे. या सरकारमध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा आहे. हा अजेंडा शिवसेनेचा आहे की, राष्ट्रवादीचा ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.

पदोन्नती आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आठवले पवारांची भेट घेणार

पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha reservation)मुद्यावर रामदास आठवले (Ramdas Athavale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. पदोन्नतीमधील अरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित घ्यावा, अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकारची जाबाबदारी असेल. यापुढे दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काची अडवणूक करू नका, त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा गंभीर इशारा रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर आता त्यांचा पक्ष आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

बुलडाण्यातील हल्ला अमानुष, हल्लेखोरांवर कारवाई करा; आठवलेंची मागणी

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील चितोडा येथील रमेश हिवराळे या दलित तरुणावर झालेला हल्ला अमानुष होता, या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निषेध नोंदवला आहे. येथील सवर्ण समाजातील एका कुटुंबातील 10 जणांनी रमेश हिवराळे या दलित तरुणावर तलवार, गुप्ती, लाठी-काठीने मारुन जीवघेणा हल्ला केला होता. हा हल्ला अत्यंत अमानुष हल्ला होता, या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फ़े तीव्र निषेध करीत आहोत. हा अमानुष हल्ला करणाऱ्या आरोपींची पाठराखण करण्याची कोणीही भूमिका घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष द्यावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

इतर बातम्या

फडणवीसांनी माझं ‘ते’ मत ऐकलं असतं तर आज मुख्यमंत्री असते, आठवले बोलता बोलता बरंच बोलून गेले!

कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत दुमजली इमारत; रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

(Ramdas Athawale and RPI will protest for Muslim reservation, reservation in promotion at Azad Maidan)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें