अनिल परबांवर कवितेतून टीका, तर टोपेंवर टक्केवारींवरून हल्लाबोल; सदाभाऊ खोत यांचा घणाघात सुरूच

| Updated on: Sep 25, 2021 | 1:06 PM

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. (Sadabhau khot slams rajesh tope and anil parab over various issue)

अनिल परबांवर कवितेतून टीका, तर टोपेंवर टक्केवारींवरून हल्लाबोल; सदाभाऊ खोत यांचा घणाघात सुरूच
सदाभाऊ खोत, माजी मंत्री
Follow us on

मुंबई: रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कवितेतून टीका केली आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर टक्केवारीवरून हल्लाबोल केला आहे. (Sadabhau khot slams rajesh tope and anil parab over various issue)

सदाभाऊ खोत यांनी ट्विट करून टीका केली आहे. एक रात्री आधी असा काय शासनाला साक्षात्कार झाला की आरोग्य भरतीच्या परीक्षा रद्द करायचा चमत्कार करावा लागला. अहो आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे परीक्षा रद्द झाली आहे का? महाभकास आघाडी अजून विद्यार्थ्यांसोबत किती छळ करणार? असा सवाल खोत यांनी केला आहे.

परबांवर कवितेतून टीका

सदभाऊ खोत यांनी अनिल परब यांच्यावर कवितेतून खोचक टीका केली आहे. खोत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक लहान मुलगा आणि एक व्यक्ती दिसत आहे. परंतु पाऊस पडत असून एसटीचं छत गळत असल्याने या व्यक्तिने एसटीतच छत्री उघडल्याचं दिसत आहे. त्यावरून खोत यांनी परब यांना चिमटे काढले आहेत. मध्यमवर्गीयांची लालपरी का रुसली, अनिल परब साहेब, तुमची विकासाची चाकं भ्रष्टाचाराच्या गाळात रुतली. आपली सीट आपली जबाबदारी, आम्ही फक्त वसुली करणार, हीच सरकारची जबाबदारी, असं त्यांनी कवितेतून म्हटलं आहे.

खोतांची कविता

मध्यम वर्गीयांची लालपरी का रुसली,
अनिल परब साहेब तुमची विकासाची चाक
भ्रष्टाचाराच्या गाळात रुतली.

आपली सिट, आपली जबाबदारी !
आम्ही फक्त वसुली करणार ही सरकारची जबाबदारी !

गोंधळ सुरूच, आरोग्य विभागाची परीक्षा रद्द

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र कंपनीच्या असमर्थततेमुळे परीक्षा रद्द केल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. मात्र शासनाने रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कुणी प्रवास करत होतं. तर कुणी अगोदरच पोहोचलं होतं. मात्र शासनाने परीक्षेला जेमतेम 12 तास बाकी असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे?

दरम्यान, आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं परीक्षा रद्द झाली, या सरकारचा घोळ काही समजत नाही, प्रवेश पत्र यूपीमधलं मिळतं, सगळंच कन्फ्युजन आहे. काही दलाल मार्केटमध्ये आलेले आहेत. या पदांसाठी त्यांच्यापासून ५ लाख, १० लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केले.

या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशाराही यावेळी फडणवीसांनी दिला. या प्रकरणाची १०० टक्के चौकशी व्हावी, हे दलाल कोण आहेत ते समोर आलं पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे, या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का?, असा सवाल फडणवीसांनी विचारला. हा दलालीचा नवा अध्याय सुरु झालाय, परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, असंही फडणवीस म्हणाले. (Sadabhau khot slams rajesh tope and anil parab over various issue)

 

संबंधित बातम्या:

परीक्षा होणारच, जाहीर केलेल्या जागा भरणारच, झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो : राजेश टोपे

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांना त्रास झाला, मनापासून माफी मागतो, आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया