मुंबईत महापौरपदी अमेरिकन माणूस चालेल का? संदीप देशपांडेंचा टोला, म्हणाले आपल्याला इटालियन सोनिया गांधी…
जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि सर्वात तरुण महापौर म्हणून ऐतिहासिक विजय मिळवला. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र टीका केली.

डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नागरिक जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि सर्वात तरुण महापौर ठरले आहेत. या निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांना उघड विरोध केला होता. मात्र, ट्रम्प यांच्या धमक्या आणि टीकेला न जुमानता ममदानी यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवून सर्वांना चकित केले आहे. आता यावरुनच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप आणि महायुतीला टोला लगावत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ममदानींच्या विजयाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या चर्चेवर अनेक प्रश्न विचारले. भाजपवाले कालपासून लंडनमध्ये मुस्लिम पंतप्रधान झाले हा एक विषय रेटत आहेत. यावरून भाजपला फक्त मुस्लिम महापौर हा एक नॅरेटिव्ह (Narrative) सेट करायचा आहे. मग भाजपने अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले, ते मुस्लिम होते म्हणून? ते कट्टर धार्मिकतेचे होते का? मानसिकता महत्त्वाची आहे,” असे संदीप देशपांडे म्हणाले.
मुंबईत इथे तसं झालं तर चालेल का?
यावेळी संदीप देशपांडे यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय महापौर होतोय, तर आनंद व्यक्त करायचा का? मग अमेरिकन माणूस भारतात मुंबईत चालेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्याला इटालियन सोनिया गांधी चालल्या नाहीत. आताचे महापौर (ममदानी) यांनाही २०१८ मध्ये नागरिकत्व मिळाले आहे. तिथल्या स्थानिकांना ते महापौरपदी बसले हे रुचले का? मग मुंबईत इथे तसं झालं तर चालेल का? असेही संदीप देशपांडेंनी म्हटले.
ते आशिष कुरेशी आहेत
फ्रान्स किंवा इतर देशांत स्थलांतरितांविरोधात आज संताप आहे. जगात मायग्रेशनबाबत (स्थलांतर) संतापही आहे. तुम्ही परप्रांतीय इथे येऊन दादागिरी करत असाल, तर ते चालणार नाही,” असा थेट इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. यावेळी संदीप देशपांडे यांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर टीका केली. आशिष शेलार हे दुटप्पी आहेत. ते आशिष शेलार नाहीत, तर ते आशिष कुरेशी आहेत. अंतुले मुख्यमंत्री झालेच ना? शेवटी मानसिकता महत्त्वाची आहे,’ असेही नमूद केले.
दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम आणि सर्वात तरुण महापौर ठरले आहेत. त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
