
मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या कौटुंबिक वादळाला अखेर पूर्णविराम मिळाला. पण आज खासदार संजय राऊत यांनी दुसर्या एका प्रकरणाचा गौप्यस्फोट केला. सिद्धांत शिरसाट यांच्या कमाईचे साधन काय असे विचारत त्यांनी महागडी मालमत्ता खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून असा सवाल राऊतांनी केला. काय आहे हे प्रकरण? काय आहे राऊतांचा तो दावा?
काय आहे मालमत्ता प्रकरण?
आज झालेल्या पत्र परिषदेत संजय राऊत म्हणाले की, हे कौटुंबिक विषय असतात. यात आमच्या सारख्या नेत्याने पडू नये. त्यासाठी महिला आयोग आहे. महिला आघाड्या आहेत. त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी कधी कुणाच्या कौटुंबिक विषयावर बोलत नाही. बोलू नये. पण तुम्ही ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं संजय शिरसाट आणि त्यांचे चिरंजीव आहेत. त्यापेक्षा भयंकर प्रकरण आहे, असा दावा राऊतांनी केला.
या महाशयांनी संभाजीनगर मधील वेदांत हॉटेल आणि प्रॉपर्टी प्रकरण आहे. अत्यल्प मूल्यावर आपल्या नावावर ती प्रॉपर्टी ताब्यात घेतली. जणू ही संपूर्ण प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांनाच मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर राबवली. ६७ कोटी रुपयाला प्रॉपर्टी घेतली. आकडा लहान नाही. एका मंत्र्याच्या मुलाकडे ६७ कोटी आहे. जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. ६७ कोटी रुपयाला वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी ही विकत घेतली. मूळ किंमती पेक्षा कमी पैशात ही प्रॉपर्टी त्यांना मिळावी म्हणून ही लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली. टेंडर भरणाऱ्यांना कमी रक्कम भरायला लावली.
एका मंत्र्याचा मुलगा आगापिछा नाही. महान नाही. उद्योग क्षेत्रात नाव नाही. संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. कुठून आले पैसे. कोणत्या टेंडरींगमधून आले. कोणत्या दलालीतून आले. एकनाथ शिंदेंनी दिले पैसे की अमित शाहनी दिले, असा घणाघात राऊतांनी घातला. पचास पचास खोके आये थे. उनको ज्यादा मिला का. सर्व आहे. येईल आता. मंत्र्याचा मुलगा ६७ कोटीत हॉटेल विकत घेतो. तुमची मुलंबाळं विकत घेऊ शकता का. अचानक पैसा कुठून आला. आमचा मुलगा ६७ कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो हा या राज्यातील सोशल जस्टीस आहे, असा हल्लाबोल राऊतांनी शिरसाट यांच्यावर केला.
या घोटाळ्याविषयी सरकारकडे तक्रार
प्रॉपर्टीची किंमत अधिक आहे. ही प्रॉपर्टी ६७ कोटीला विकत घेतली. अंबादास दानवे हे आमचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी या प्रक्रियेत कसा घोटाळा झाला. याचं पत्र सरकारला दिलं आहे. मी कालच अंबादास दानवेंशी चर्चा केली. हे प्रकरण जनतेसमोर आणा. जनसेवेसाठी, बाळासाहेबांच्या विचारासाठी ज्यांनी पक्ष सोडला आणि आमची शिवसेना खरी असं म्हणतात. ती खरी आहे का, असा सवाल राऊतांनी केला आहे. तर अमित शाह यांनी त्यांना महाराष्ट्र लुटीचा परवाना दिला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.