देवेंद्रजींना राष्ट्र साद घालतंय, फडणवीस जावेत म्हणून काही लोक देव…; संजय राऊत यांचा दावा काय?
संजय राऊत यांच्या मते, देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील कारण पंतप्रधान मोदींना त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळ मजबूत करायचे आहे. फडणवीस 'मी इथेच राहीन' म्हणत असले तरी, त्यांना आजूबाजूचे लोक आणि काही 'देव पाण्यात घालून' बसलेले लोक दिल्लीत ढकलत आहेत. राऊत यांनी फडणवीसांच्या दिल्लीवारीची शक्यता व्यक्त करत, त्यासाठी तयारी करण्याची सूचनाही केली.

देवेंद्र फडणवीस हे मी इथेच राहीन म्हणत असले तरी त्यांना राष्ट्र साद घालत आहे. कारण मोदींना कॅबिनेट मजबूत करायची आहे. फडणवीस हे दिल्लीत जावेत म्हणून त्यांना आजूबाजूचे लोक ढकलत आहेत. काही लोक तर फडणवीस जावेत म्हणून देव पाण्यात घालून आहेत. त्यामुळे फडणवीस यांना दिल्लीत जावे लागणार आहे, असं सांगतानाच फडणवीस याता दिल्लीला जाण्यासाठी तयारी करतील, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला आहे.
फडणवीस हळूहळू इकडचं काम आवरतील आणि मग जातील. राज्यातून अनेक लोक दिल्लीत गेले. गोपीनाथ मुंडे असतील तर विलासराव देशमुखही दिल्लीत गेले. दिल्लीत जाण्यापूर्वी मूळ घर आवरावं लागतं. आपल्या माणसांची व्यवस्था लावायची असते. पण देवेंद्रजींना राष्ट्र साद घालत आहे. मी इथेच राहणार म्हणता. तुम्ही लाख म्हणाल. पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलत आहेत. देव पाण्यात घालून आहेत. आमच्या तुमच्याबद्दल सदभावना आहेत. तुम्ही कधी दिल्लीत जातात हे काही लोक पाहत आहे. काही लोक अमित शाहांना भेटत आहेत. त्यांना दिल्लीत घेत आहात, तर माझं काही करा म्हणून सांगत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
शिंदे आले, ते नाही
फडणवीस हे इथेच राहीन म्हणतात. पण ते इथेच राहणार नाहीत. त्यांनी पुन्हा येईन म्हटलं होतं. तेव्हा ते पुन्हा आले नाही. त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली. राज्यपालांना मॅनेज करावं लागलं. 50-50 कोटींना माणसं विकत घ्यावी लागली. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लालच द्यावी लागली. शिंदे मुख्यमंत्री म्हणून आले. फडणवीस नाही आले. ते इथेच राहणं आवघड आहे. आम्हाला ते इथे हवे आहेत. आम्ही त्यांच्या वाईटावर नाही. पण त्यांना राष्ट्र साद घालत आहेस, असंही त्यांनी सांगितलं.
एक तास पुरेसा
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात एखाद्या मंत्र्याला घेण्यासाठी एक तास पुरेसा असतो. आज चार घेतले म्हणून पाचवा घ्यायचं नाही असं नाही. राष्ट्रपतींना किंवा राज्यपालांना एक पत्र द्यायचं असतं. धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या शिक्षण खात्यात उत्तम प्रकारे काम करू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन उभं राहिलं. तरुणांच्या दबावाखाली प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. एक महिना झाला नाही, तोच प्रधान यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचं असेल तर देशाच्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. अर्थात हा प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी सांगितलं. जे मोजके शहाणे लोक त्या टीममध्ये आहेत. त्यापैकी विनोद तावडे आहेत. त्यांनी चांगलं काम केलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष एक टीम तयार करतो आणि काम करतो. त्यावर बोलणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.