एप्रिल-मे महिन्यात केंद्रात मोठ्या घडामोडी घडणार; खासदाराच्या दाव्याने खळबळ
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय दावा केला आहे की, एप्रिल-मे महिन्यात केंद्रात मोठ्या घडामोडी घडतील आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी नसतील. राज ठाकरे यांच्या दाव्याचे समर्थन करत राऊत म्हणाले की, भाजप सरकारचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दिल्लीतील आकलनातून हा निष्कर्ष काढल्याचे त्यांनी सांगितले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातून आणि राज्यांमधून भाजपचं सरकार जाणार आहे. हे घडणारच आहे. भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, असा दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज ठाकरे यांच्या या दाव्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. एप्रिल-मे महिन्यात केंद्रात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पुनरुच्चार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारमध्ये अस्वस्थता आहे. बोऱ्याबिस्तरा बांधला पाहिजे या भूमिकेपर्यंत ते आले आहेत. तरी शेवटची धडपड करत आहे. या सरकारला जावं लागणार आहे. एप्रिल आणि मे पर्यंत देशात मोठ्या घडामोडी होतील. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नसतील हे मी वारंवार सांगतो. याला आधार आहेत. वेगवेगळे आधार आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
त्यामुळे निष्कर्ष काढला
हा मुळात एप्रिल-मे महिन्याची तारीख मीच दिली. त्यानंतर इतरांना ती प्रिय झाली. मी सर्वात आधीपासून सांगतो. दिल्लीत बसून आम्ही जे आकलन करतो, त्यातून हा निष्कर्ष आला आहे. मोदी मे पर्यंत खेचू शकतील. नंतर ते थकतील आणि जातील, असं राऊत म्हणाले.
राष्ट्रपतींचाही फोन टॅप होत असेल
राहुल गांधी यांचा फोन टॅप करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या देशात कुणाचे फोन टॅप केले जात नाहीत? या देशात कदाचित राष्ट्रपतींचे फोन टॅप केले जात असतील. राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि योगी आदित्यानाथ यांचेही फोन टॅप केले जात असतील. मोदी आणि शाहांवर कुणाचाही विश्वास नाही. हुकूमशाह याच पद्धतीने वागत असतो. त्यामुळे आमचे फोन टॅप केले जात आहेत. लष्करी अधिकाऱ्यांचेही फोन टॅप केले जात असतील. त्यामुळे राहुल गांधींचे फोन टॅप केले जात असतील यात आश्चर्य वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.