
Sanjay Raut on Gautam Adani: काल मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर आणि शिंदेसेनेचा उपमहापौर विराजमान झाले. त्यावेळी बीएमसी सभागृहात मोदी मोदी असा जयघोष झाला. त्यावरून आज उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी चिमटा काढला. कालच्या घटनेवर त्यांनी तोंडसुख घेतले. या घोषणाबाजीवर त्यांनी मनमोकळं केलं. यावेळी त्यांनी देशातील तपास यंत्रणा लाचार आणि गुलाम असल्याची घणाघाती टीका सुद्धा केली. पत्रकार परिषदेत राऊत यांनी विविध मुद्यावर जोरदार बॅटिंग केली.
महिला सुरक्षेसाठी महापौरांनी ठिय्या आंदोलन करावं
मुंबई महानगरपालिकेत महापौरांनी काल पदभार स्वीकारला. तो पदभार स्वीकारताना हा सोहळा याची देहि याची डोळा पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्यांचा सर्व लवाजमा महापालिकेत उपस्थित होता. त्यावेळी महापौरांनी मुंबई भ्रष्टाचारमुक्त करू अशी घोषणा केली. मग चार वर्षात भ्रष्टाचार कोणी केला? त्यांच्याच प्रशासकानं, नगररचना खात्याने केला आहे. नक्कीच याची चौकशी व्हायला पाहिजे. मुंबई महिलांसाठी सुरक्षित करू असे ते म्हणाले. जर मुंबई महिलांसाठी सुरक्षित वाटत नसेल तर याचा अर्थ गृहमंत्र्यांचं हे अपयश आहे. काल महापालिकेत ते उपस्थित होते. त्यांची जबाबदारी आहे महिलांची सुरक्षा करणं, हे काय महापौरांचं काम आहे का? याचा अर्थ त्याचं संपूर्ण गृहखातं मुंबईला सुरक्षित करण्यात अपयशी आहेत. त्याच्याबद्दल मुंबईच्या महापौरांनी गृहमंत्र्यांच्या दालनाबाहेर ठाण मांडलं पाहिजे, ठिय्या आंदोलन केलं पाहिजे. मुंबईच्या विकासासाठी काम करायला हवे. मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम असली शिवसेनेने केले आहे.
नशीब त्यांनी अदानी…अदानी घोषणा दिल्या नाहीत
काल तिकडं नकली शिवसेना होती. मला तर आश्चर्य वाटलं की, महापालिकेत येताना मोदी मोदी घोषणा काय देताय, नशीब यांनी अदानी, अदानी अशा घोषणा दिल्या नाहीत. मोदी मोदी म्हणजे अदानी अदानी असं होतं. त्याचा दुसरा अर्थ तो आहे. ही मुंबई मराठी माणसांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून शिवसेना स्थापन झाली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. धारावी विकायला काढू, टोल नाके विकायला काढू, मदर्स डेअरी विकायला काढू, नानावटी हॉस्पिटलसमोरचा ४०० एकरचा भूखंड गौतम अदानी यांना हवाय असा आरोपही राऊतांनी यावेळी केला. तर अजितदादांच्या विमान अपघाताविषयी तपास यंत्रणांच्या तपासाबाबत काहीच होणार नाही असे सूतोवाचही संजय राऊत यांनी केले. त्यांनी याप्रकरणी रोहित पवार यांनी सत्य बाहेर आणल्याचे म्हटले आहे.