
Sanjay Raut on NCP Sunetra Pawar: बुधवारी उपमुख्यमंत्री अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. दोन दिवसांनी शुक्रवारी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव समोर करण्यात आला. राष्ट्रवादीची खाती पक्षाकडेच ठेवण्याची मागणी करण्यात आली. आज सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठी टीका केली आहे. या घडामोडींची सूत्रं कुणाच्या हातात आहे याविषयी त्यांनी मोठं भाष्य केलं.
अमित शाहांचे नाव आणि तो खुलासा
संजय राऊत यांनी या घडामोडींवर मोठे भाष्य केले. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील अशा बातम्या वाचल्या. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्याच्यावर आम्ही काय बोलावं.पण अजूनही महाराष्ट्र अजित पवार यांच्या दु:खातून सावरलेला नाही.त्याच्यामुळे अजितदादांच्या कुटुंबातील कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि कौटुंबिक विषय आहे. कोणी त्यावर मत व्यक्त करण्याची ही अजिबात वेळ नाही. त्यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय नेते आहेत. सुनील तटकरे, छगन भुजबळ हे राष्ट्रीय नेते आहेत. अशी असंख्य नेत्यांची त्यांच्या पक्षात मोठी फळी आहे. अशा नेत्यांनी निर्णय घेतला असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता.शेवटी हा निर्णय अमित शाह यांनी घेतला असेल असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.
अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे. त्यामुळे शरद पवार जे बोलत आहेत, ते सत्य आहे, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाविषयी कुणालाच काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षातंर्गत निर्णय आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे राष्ट्रीय नेते तटकरे, भुजबळ, पटेल यांनी वर्षा बंगल्यावर येऊन चर्चा केली आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल, असा गौप्यस्फोटही राऊतांनी केला. भारतीय जनता पक्ष हा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाला दुखवटा, दु:ख याविषयीच्या यांचा कधी संबंध आलेला नाही. त्यामुळे हे पक्ष मढ्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणारे आहेत. पण ही वेळ यावर बोलण्याची नाही असे राऊत म्हणाले.
भाजपला शिवसेना गिळायची होती
अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादीची शक्यता होती, असं शरद पवार यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. आता पुढे काय होईल हे मी कसं सांगणार. मी यावर काय बोलणार. पण यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही, असे राऊत म्हणाले. याविषयावर मी सध्या काही बोलणार नाही. पण नक्की बोलेल. या देशात भाजपच्या बाबतीत ज्या घटना घडल्या त्याविषयी मी बोलतो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांना शिवसेना नेतृत्वहीन झाली, त्यामुळे हा शिवसेना गिळण्याची त्यांची फार मोठी योजना होती. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची ही योजना उधळून लावली हा सुद्धा भाजपला राग असल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.