ठाकरे बंधूंना गजनी म्हणताच संजय राऊत संतापले, मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका; म्हणाले, भाजपचा मेंदू…

मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना 'गजनी' संबोधल्याने संजय राऊत संतापले. राऊत म्हणाले, 'भाजपचा मेंदू हलला आहे, जसे ब्रिटिश साम्राज्याला उतरती कळा लागली तेव्हा त्यांचा मेंदू हलला होता.' राऊत फडणवीसांवर जोरदार टीका करत म्हणाले की, ज्ञानेश कुमारविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. भाजपचं मानसिक संतुलन बिघडलं असून हे 'कोल्हेकुई' म्हणणारे स्वतः कोल्हे आहेत.

ठाकरे बंधूंना गजनी म्हणताच संजय राऊत संतापले, मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका; म्हणाले, भाजपचा मेंदू...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2026 | 11:06 AM

ठाकरे बंधूंच्या कालच्या मोर्चावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना गजनी संबोधून त्यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कालच्या मोर्चात लाखो लोक आले होते. केवळ मुंबई, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. ब्रिटिश साम्राज्याला उतरती कळा लागली तेव्हा ब्रिटिशही असंच काही बरळत होते. ब्रिटिशांचा मेंदू हलला होता. तसाच भाजपचा मेंदू हलला आहे, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी भाजपवर चढवला. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

जस्टीस उज्ज्वल भुइयां यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी भुइयां यांना गजनी म्हणावं. जस्टिस भुइयां यांनी परखड मत मांडलं आहे. कोट्यवधी नागरिकांनी मतांचा अधिकार गमावला असेल तर चुकीचं आहे, असं भुइयां यांनी म्हटलंय. ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत. त्यांना काही कळतं का? ते गजनी आहेत. राजकीय जमीन शोधत आहेत, असं आता फडणवीस यांनी बोलावं. शेलारांनीही भुइयां कोल्हेकुई करत असल्याचं म्हणावं, असे टोले लगावतानाच भाजपचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. 1942 मध्ये ब्रिटिशांचंही मानसिक संतुलन बिघडलं होतं. तेही असंच करत होते. ब्रिटिशांचीही अरेरावी सुरू होती. ब्रिटिश राज्याला उतरती कळा लागली तेव्हा त्यांचाही मेंदू हलला होता. तसाच भाजपच्या या लोकांचा मेंदू हलला आहे, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.

Loading...

ते कोल्हे, त्यांना कोल्हेकुईच दिसणार

अख्या देशात कालच्या मोर्चाची चर्चा झाली. ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईत अतिविराट मोर्चा काढला. या विषयावरचा आतापर्यंतचा देशातील हा सर्वात मोठा मोर्चा झाला. शेलार त्याला कोल्हेकुई म्हणाले. मोर्चाचं नाव गर्जना होतं. ते कोल्हे कुई म्हणतात. कारण तेच कोल्हे आहेत. त्यांना कोल्हेकूईच दिसणार. ते चिरकूट आहेत. मुख्यमंत्र्यांनी गजनी म्हटलं. मुंबई, महाराष्ट्रातच मोर्चे निघत नाहीत, तर देशभरात आंदोलन सुरू आहे. दिल्लीला सैन्य छावणीचं स्वरुप आलं आहे. मोदी आणि शाह घाबरले आहेत. त्यांच्या घराच्यासमोर आणि इंडिया गेटवर सशस्त्र बल, बॉर्डर सेक्युरिटी फोर्स लावला आहे. एवढी भीती या आंदोलनाची आहे. कपिल सिब्बल सारखे ज्येष्ठ वकील रस्त्यावर उतरले आहेत. यावरून देशात किती रोष आहे हे दिसून येतंय, असं राऊत म्हणाले.

तेव्हाच ते सर्वोच्च पदी जातील

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला बहुतेक उतरती कळा लागली आहे. आम्ही त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचं दिल्लीत स्थान आहे, असं आम्ही म्हणतोय. पण ते स्वत:चं नुकसान करून घेत आहेत. कालचा मोर्चा आत्मचिंतन करणारा आहे. ठाकरेंनी आंदोलन केलं. लाखो लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा त्याला रडगाणं म्हणत नाही. मोदी करतात ते रडगाणं असतं. पण जेव्हा लाखो लोकं रस्त्यावर येतात तेव्हा ती क्रांती असते. हे फडणवीस यांना समजेल तेव्हा ते केंद्रात सर्वोच्च पदी जातील. आता ते पाईपलाईनमध्ये आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

शेलारांनी चुकीचं बोलू नये

यावेळी त्यांनी शेलारांचाही समाचार घेतला. आशिष शेलार आमचे मित्र आहेत. पण त्यांनी चुकीचं विधान करू नये. काल मुंबईकरांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला ती देशाची भावना आहे. ज्ञानेश कुमारसारखा लफंगा, चोर, दरोडेखोर मतांवर दरोडे टाकतो. त्याच्याविरोधात अजून काही झालं पाहिजे. अमित शाह भूमिगत आहेत. ज्ञानेश कुमार भूमिगत आहे. सीमा खन्ना भूमिगत आहे. या ना लोकांसमोर, असं आव्हानच त्यांनी दिलं.

ज्ञानेश कुमार कुठे लपलेत?

उद्याच्या विरोधी पक्षांच्या मोर्चावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उद्या आम्ही सर्व जमणार आहोत. पार्लमेंटचं मकरद्वार आहे, तिथून चालत आम्ही आयोगाच्या ऑफिसवर जाणार आहोत. आयोगाने आम्हाला भेट द्यावी ही आमची मागणी आहे. देशभरातील विरोधी पक्ष येणार आहे. आम्ही पुरावे देणार आहोत. ज्ञानेश कुमार यांनी समोर आलं पाहिजे. पण ते येत नाहीये. भूमिगत आहेत. कुठे लपलेत? असा सवाल त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us