
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील हुकमी एक्का असलेले एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 रोजी समर्थकांसह बंड पुकारले आणि ते थेट सुरत गेले. ही सुरत स्वारी गाजली. पण त्यापेक्षा राज्यात चर्चा झाली ती गुवाहाटी दौऱ्याची. या दौऱ्यात शहाजीबापू पाटलांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’, हा संवाद अजरामर झाला. तर अनेक किस्से, कथा त्यानंतर कायमच्या प्रचलित झाल्या. या दौऱ्याने राज्यात तंत्र, तांत्रिक, शाक्त पंथ अशा एका ना एक धार्मिक विधीची चर्वण कथा प्रसिद्ध झाल्या. आजही दिल्ली ते गल्लीपर्यंत हे किस्से चवीने सांगितले जातातच. आता त्यात मंत्री संजय शिरसाट यांनी अजून एका किस्स्याची भर घातली आहे.
हा म्हटला हॉटलेवरून उडीच मारतो
मंत्री संजय शिरसाट नांदेडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त हजर होते. आंबेडकरवादी समाजाच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात शिरसाट चांगलेच खुलले आणि मग त्यांनी गुवाहाटीतील किस्सांच्या पोतडीतून एक जोरदार किस्सा बाहेर काढला. त्यांनी बंडखोरी आणि गुवाहाटीतील घटनाक्रम आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
“मी गेल्या 42 वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्या आयुष्यातील ही तिसरी बंडखोरी होती. पण आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासाठी ती पहिलीच वेळ होती. आम्ही संख्या मोजत होतो आणि कल्याणकर इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी जेवणही सोडलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर सतत भीती होती. आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघात काय परिणाम होईल? ही चिंता त्यांना सतावत होती. एवढ्या तणावाखाली ते हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते. एकदा तर आमदार बालाजी कल्याणकर म्हटले हॉटेलवरून उडीच मारतो जर एखादा आमदार कमी जास्त झाला असता तर आमची सुद्धा आमदारकी रद्द झाली असती. कल्याणकर जेवत नव्हते. त्यानं म्हटलं बालाजी जेवला नाही तर मरशील. जेवून तरी मर, त्याचबरोबर एकदा तर म्हटला मी आता हॉटेल वरून उडीच मारतो. आम्हाला एका एका आमदाराचं पडलं, एखादं कमी जास्त झाल असेल तर आमची सुद्धा आमदारकी रद्द झाली असती. म्हणून आम्ही बालाजी कल्याणकर याच्यासोबत दोन माणसं नेहमी त्यावेळी ठेवली.” असा गौप्यस्फोट मंत्री संजय शिरसाट यांनी केला.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीला निधी दिल्याबद्दल संजय शिरसाठ यांचा नांदेडमध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंत्री संजय शिरसाठ यांनी बंडखोरी संदर्भातील किस्सा सांगितला, यावेळी त्यांनी नांदेड उत्तर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या संदर्भात हा मोठा गौप्यस्फोट केला.
“त्यांना सांगितलं कल्याणकर आम्ही करतोय, आमचा राजकारण पणाला लावतोय उद्या काय बरं वाट होईल आम्ही डायरेक्ट वॉश आऊट होऊ. तू नवीन आहे तुला कोणीही माफ करेल, परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.
आज कल्याणकरने जे काम केले त्याच्या पहिले 25 आमदार झाले असतील, पाच आमदार झाले असतील मतदारसंघात जास्त काम केले का नाही. आमच्यापेक्षा हुशार तोच निघाला सगळ्यात जास्त निधी त्यांनाच घेतला, दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला. आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा” असा शिरसाटांनी टोला लगावताच सभागृहात खसखस पिकली. ठेच लागल्याशिवाय राजकारण कळत नाही, तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला ठेच लागत नाही, तोपर्यंत त्रास कळत नाही, असे शिरसाट म्हणाले.