
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा पवार काका-पुतण्यांना लक्ष्य केले. पवार कुटुंबियांविरोधात हाके सातत्याने बोलत आहेत. विशेष म्हणजे अजित पवार महायुतीत असतानाही हाके त्यांच्याविरोधात बोलत आहेत. त्यामुळे हाके यांना नेमकी फुस कुणाची आहे, याची जोरदार चर्चा सुरू आहे. लक्ष्मण हाके केवळ पवारांविरोधातच का बोलत आहेत, असा प्रश्न विचारल्या जात आहेत. त्यामागे त्यांचे काय लॉजिक आणि मॅजिक आहे, यावर राज्यात खल सुरू आहे.
त्यांनी ओबीसी आरक्षण संपवलं
शरद पवारांची भूमिका ओबीसींना आवडलेली नाही. मंडल यात्रा प्रकरणी लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर टीका केली.ओबीसी मतदार दूर गेल्यामुळे शरद पवारांचा हा प्रकार सुरू आहे. शरद पवारांनी ओबीसींचे आरक्षण संपवलं, अशी जळजळीत प्रतिक्रिया हाके यांनी दिली. शरद पवारांची ही भूमिका ओबीसी समाजाला अजिबात आवडलेले नाही. शरद पवार हे दुतोंडी मांडुळासारखे वागतात. शरद पवार यांनीच महाराष्ट्र मधील ओबीसीचे आरक्षण संपवल आहे. त्यांनीच मनोज जरांगे यांना रसद पुरवली आहे, असा गंभीर आरोप हाकेंनी केला. शरद पवार यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे’ नाव घेऊन ओबीसींचा आरक्षण बुडवले, असा आरोप त्यांनी केला.
अजितदादांवर टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जातीवादी नेते आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. अजित पवार हे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार,कारखानदार यांचे नेते असल्याचे म्हणत ते जातीयवाद करत असल्याचा आरोप हाकेंनी केला. पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. अजितदादा पवार यांचा महाज्योती संदर्भातील सामाजिक दुजाभाव मी वारंवार महाराष्ट्राला सांगितला आहे.
अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला न शोभणारे व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय काहीही माहित नाही. पवार कुटुंबीय नेहमीच सत्तेत असतं म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो, असे लक्ष्मण हाके म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे या केवळ वडिलांच्या मायलेज वर निवडून येतात. त्यांचं संसदेत काय काम आहे? म्हणून त्यांना आदर्श संसद रत्न पुरस्कार मिळतो. खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजातल्या तळागाळातील लोकांचे प्रश्न कधी संसदेत मांडले आहेत का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला.
राज्यात मराठा-ओबीसी वाद भडकणार
महाराष्ट्राला पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी देते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मनोज जरांगे या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटू पाहत आहेत, असा आरोप हाकेंनी केला.