Sharad Pawar: ऑपरेशन ब्लू स्टारविषयी मुक्ताफळं… शरद पवारांचा गिरीश महाजनांना सणसणीत टोला… केली सडकून टीका 

Sharad Pawar Criticized Girish Mahajan: ऑपरेशन ब्लू स्टारविषयी मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचे पडसाद सगळीकडेच उमटत आहे. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी महाजन यांच्यावर सडकून टीका केली.

Sharad Pawar: ऑपरेशन ब्लू स्टारविषयी मुक्ताफळं... शरद पवारांचा गिरीश महाजनांना सणसणीत टोला... केली सडकून टीका 
शरद पवार, गिरीश महाजन
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 10, 2026 | 2:47 PM

Sharad Pawar Criticized Girish Mahajan: ऑपरेशन ब्लू स्टारविषयी मंत्री गिरीश महाजन यांनी काल पंजाबमध्ये मोठे वक्तव्य केले. ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असल्याचे वक्तव्य करून त्यांनी वाद ओढावून घेतला. त्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही त्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. ती पक्षाची नाही तर महाजन यांची वैयक्तिक भूमिका असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर या वक्तव्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गिरीश महाजन यांचे कान टोचले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 27 वा वर्धापन दिन मुंबईत झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी महाजानांवर टीकास्त्र सोडले.

महाजनांचे पवारांनी टोचले कान  

एक गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील एक मंत्री काल शीख समाजाच्या कार्यक्रमाला गेले. ते गेले त्याबद्दल काही म्हणायचं नाही. त्यांनी जे भाषण केलं. ते हस्यास्पद होतं. त्यांनी फार मोठी टिका टिप्पणी केली. त्यांनी इंदिरा गांधींवर टीका केली. इंदिरा गांधींनी या देशाला स्वातंत्र्यानंतर संघटित केलं. जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. त्या महान व्यक्ती होत्या. इंदिरा गांधींनी देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली नाही, असे शरद पवार यांनी महाजनांना सुनावले.

अशी वक्तव्य देशहितासाठी योग्य नाही

पण काही गोष्टी घडल्या. काही लोकांनी तरुणांच्या मनात चुकीच्या गोष्टी टाकून त्यांना चुकीच्या रस्त्यावर नेले. त्या रस्त्यावर अनेक हत्या झाल्या. ज्यांनी देशाला योगदान दिले, त्यात काही अधिकारी होते, जे निस्पृह होते. जनरल वैद्य यांची हत्या झाली. या हत्येत शीखांचा हात होता असं सांगण्याचं काम काही लोकांनी केलं. शीखांबाबत आदर आहे. पण काल तिथे गेलेल्या मंत्र्याने शिखांवर काँग्रेस आणि देशाने अन्याय केला असं भाषण करून संबंध देशाची दिशाभूल केली. इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली, अनेकांची नावे घेता येतील. पण या गोष्टी आपण विसरूया. पण महाराष्ट्राचा एक मंत्री तिकडे जाऊन हे सर्व शीखांचं शिरकाण काँग्रेसच्या विचाराच्या लोकांनी केलं, असं बोलत आहेत. हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले.

नेहरू-गांधी कुटुंबाचा त्याग विसरता येणार नाही

नेहरू आणि मोदी हे दोघेही पंतप्रधान होते. त्याबाबत काहीही भाष्य करा. पण नेहरू हे नेहरू होते. नेहरू हे देशाचे नेते होते. ते स्वातंत्र्याच्या काळात ऐन उमेदीचा काळ देशाला देणारे होते. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी देशाच्या रक्षणासाठी काम केलं. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधींची हत्या झाली. राजीव गांधींची हत्या झाली. त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग भारतीय विसरू शकत नाही. त्यांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

याच मुंबई शहरात महात्मा गांधींनी ग्वालिया टँकवर काँग्रेसचा मेळावा होता. त्यावेळी छोडो भारतचा नारा दिला. ही घोषणा दिल्यावर गांधींना अटक झाली. त्यानंतर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत नेहरू, आझाद होते. त्यांनाही अटक केली. त्यांना नगरच्या तुरुंगात टाकलं. अनेक वर्ष हे सर्व नेते नगरला होते. त्यागाच्या इतिहासात या सर्वांचं काम कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे कृपा करा आणि त्यांचा सन्मान ठेवा. त्यांची तुलना नको तिथे करू नका. हे सांगायची वेळ आली आहे, अशी चपराकही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावली.

Follow Us