मिंधे सरकार आल्यापासून पनवती, शिवशंभोचा शंख फुंकावाच लागेल; दैनिक ‘सामना’तून कुरापतीवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या फुटीरतावाद्यांना आधी सुरत आणि नंतर आसामच्या गुवाहाटीत राजाश्रय मिळाला होता. त्यांची काय झाडी, काय हाटील... अशी बडदास्त ठेवली गेली होती. मुक्कापासून ते कामाख्या मंदिरातील विधीपर्यंतचा पाहुणचार आसाम सरकारनेच केला होता.

मुंबई: आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केला आहे. तशी जाहिरातच आसाम सरकारने दिली आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. आसाम सरकारच्या या कुरापतीविरोधात दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात मिंधे सरकार आल्यापासून राज्याला पनवतीच लागली आहे. देव, धर्म आणि राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या महाराष्ट्राला हतबल करण्याचं हे षडयंत्र आहे. त्यामुळे या सरकार विरोधात आता राज्यातील जनतेलाच शिवशंभोचा शंख फुंकावाच लागेल, असा संताप दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यापासून राज्याला पनवती लागली आहे. केंद्रापासून इतर भाजपशासित राज्यांपर्यंत सगळेच महाराष्ट्राची लूट करत आहेत. त्यात आता आसामची भर पडली आहे. सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्राचे नसून आमचेच आहे, असा दावा आसाम सरकारने केला आहे.
शिवलीलामृत, शिवपुराण आणि इतर ग्रंथात सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याची मान्यता आहे. भीमाशंकर मंदिर हे 1200 वर्ष जुने आहे. त्याची बांधणी हेमाडपंथी आहे. तरीही या ज्योतिर्लिंगावर दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळावर हा डाका टाकण्याचा प्रकार आहे, अशी टीका दैनिक ‘सामना’तून करण्यात आली आहे.
नसता उपद्व्याप का आठवला?
सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्येच असल्याचा दावा केला जात आहे. पण ही उचकी तुम्हाला आताच कशी लागली? या आधी तुम्हाला असा साक्षत्कार का झाला नाही? अनेक महाशिवरात्री आल्या आणि गेल्या आताच तुम्हाला नसता उपद्व्याप का आठवला? राज्यातील भाजप सरकार आसामच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहे. म्हणूनच त्यांच्याकडून हा दावा केला जात असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आला आहे.
निषेधाचा नि नाही
शिंदे गटाच्या फुटीरतावाद्यांना आधी सुरत आणि नंतर आसामच्या गुवाहाटीत राजाश्रय मिळाला होता. त्यांची काय झाडी, काय हाटील… अशी बडदास्त ठेवली गेली होती. मुक्कापासून ते कामाख्या मंदिरातील विधीपर्यंतचा पाहुणचार आसाम सरकारनेच केला होता. त्यामुळेच मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकर प्रकरणी निषेधाचा नि सुद्धा निघालेला नाही, असा हल्लाही चढवण्यात आला आहे.
महाराष्ट्र धर्माला धडका
आसाम सरकारच्या पाहुणाचाराच्या बदल्यात तुम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाम सरकारला देऊन तर नाही ना आलात? या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर मिंधे सरकारकडे काय उत्तर आहे? असा सवाल ‘सामना’तून विचारण्यात आला आहे. मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र आणि भाजपशासित राज्यांची ही अशी मनमानी बिनदिक्कतपणे सुरू आहे.
देशाची आर्थिक राजधानी हा मुंबईचा मुकूट हिरावण्याचाही प्रयत्न सुरू आहे. केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राबाबत उफराटा कारभार केला जात आहे. लाचार मिंधे सरकारमुळे तो महाराष्ट्राच्या मुळावर उठला आहेच, पण महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वालाही धडका देऊ लागला आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे.
