‘चहा घेतला, खिचडी खाल्ली अन्…’ राज ठाकरे भेटीवर शिवसेना नेते उदय सामंत काय म्हणाले?
मुंबई मनपासंदर्भात चर्चा झाली असती तर मी जाहीरपणे सांगितले असते. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली असती. आजची भेट ही अराजकीय होती. आता मी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे.

शिवसेना नेते उदय सामंत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. उदय सामंत यांनी अचानक झालेल्या या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मनसे आणि शिवसेना युतीबाबत चर्चा सुरु झाली. त्यामुळे या भेटीबाबत उदय सामंत यांनी माध्यमांना माहिती दिली. राज ठाकरे यांच्यासोबत अराजकीय चर्चा झाली. त्या ठिकाणी चहा घेतला, खिचडी खाल्ली अन् निघालो, असे उदय सामंत यांनी म्हटले
काय म्हणाले उदय सामंत
उदय सामंत म्हणाले, सकाळी काही कामासाठी मी या भागात आलो होतो. त्यामुळे राज ठाकरे यांना फोन केला. मी गप्पा मारण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यांनाही वेळ होता. त्यांनी होकार दिला. राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यावर अनेक विषय कळतात. विकासाबाबत माहिती मिळते. त्यामुळे ही अराजकीय भेट होती. परंतु तुमच्या मनात जी शंका आहे. ती कोणतीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगली चर्चा झाली. चर्चे दरम्यान चहा घेतला. खिचडी खाल्ली आणि निघालो.
मुंबई मनपाबाबत चर्चा झाली का? या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले, मुंबई मनपासंदर्भात चर्चा झाली असती तर मी जाहीरपणे सांगितले असते. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली असती. आजची भेट ही अराजकीय होती. आता मी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल, राज ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा एकनाथ शिंदे यांना सांगणार? परंतु तसे काही नाही. माझी आणि राज ठाकरे यांची चौथी भेट आहे. आजच्या चर्चेत कोणतीही राजकीय खिचडी झाली नाही.




तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिला? त्या प्रश्नावर उदय सामंत यांनी सांगितले की, अनेक नेते शिवसेना उबाठा सोडत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता आत्मचिंतन करायला हवा. एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे हे नेते शिवसेनेत येत आहे. राज्यभरात शिवसेनेत इनकमिंग वाढले आहे.
संदीप देशपांडे यांनी दिला दुजोरा
उदय सामंत राज ठाकरे भेटी दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे उपस्थित होते. ते म्हणाले, उदय सामंत जे बोलले तेच खरे आहे. ते या विभागातून जात असताना त्यांनी स्वतः राज ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. सोबत चहा घेतला. खिचडी खाल्ली. बाकी दुसरे काही नाही. मी पण उदय सामंत यांच्याकडे चहासाठी जाणार आहे.