कंगनासारख्या फुटकळ बाईने रिहानावर टीका करु नये; शिवसेनेचा हल्लाबोल

रिहाना ही एक पर्यावरणवादी आहे. हवामान बदल आणि पर्यावरणविषयक प्रश्नांवर ती नेहमी बोलत असते. | Shivsena

कंगनासारख्या फुटकळ बाईने रिहानावर टीका करु नये; शिवसेनेचा हल्लाबोल
कंगनाच्या या टीकेला कवडीचीही किंमत देण्याची गरज नाही. कंगना स्वतः एक महिला असून इतर महिलांचे चारित्र्यहनन व बदनामी करण्यात ती मजबूत आहे.

मुंबई: कंगना रानौत हिच्यासारख्या फुटकळ बाईने गायिका रिहाना (rihanna) हिच्यावर केलेल्या टीकेला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, अशी टीका शिवसेना (Shivsena) आमदार मनिषा कायंदे यांनी केली. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्यानंतर कंगना तिच्यावर नेहमीच्या आविर्भावात तुटून पडली होती. ते शेतकरी नव्हेत तर दहशतवादी आहेत. तू शांत बस, मूर्ख. आम्ही तुझ्यासारखे मूर्ख नाही आहोत जो आमचा देश विकू, असे कंगनाने म्हटले होते. (Shivsena slams Kangana Ranaut over comment about farmers protest)

कंगनाच्या या ट्विटचा शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी चांगलाच समाचार घेतला. कंगनाच्या या टीकेला कवडीचीही किंमत देण्याची गरज नाही. कंगना स्वतः एक महिला असून इतर महिलांचे चारित्र्यहनन व बदनामी करण्यात ती मजबूत आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी इतरांवर टीका करून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा अट्टाहास ती करत असते. त्यामुळे अशा फुटकळ लोकांकडे दुर्लक्ष करायला पाहिजे, असे मनिषा कायंदे यांनी म्हटले.

रिहाना ही एक पर्यावरणवादी आहे. हवामान बदल आणि पर्यावरणविषयक प्रश्नांवर ती नेहमी बोलत असते. शेतकऱ्यांबद्दल तिला कळवळा आहे. भारतीय शेतकऱ्यांवर अन्याय आणि अत्याचार केले जात आहेत. दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे पाणी आणि वीज बंद करण्यात आले आहे. हे सर्व पाहून रिहानाला दु:ख झाले. त्यामुळे तिने खंत व्यक्त केली, याकडे मनिषा कायंदे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

या देशात लोकशाही जिवंत आहे का?

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सहा खासदारांनी आज गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शिवसेना खासदारांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांची भेट घेतली.

याठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला. आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांचे जे मृत्यू झाले. ते शेतकऱ्यांचे मृत्यू नसून या शेतकऱ्यांच्या हत्याच आहेत, असा घणाघाती आरोपही शिवसेनेने केला.

संबंधित बातम्या:

मोदी सरकारविरोधात जगातल्या प्रसिद्ध पॉपस्टारचं ट्विट, इंटरनेट बंदीवर सवाल, कोण आहे रिहाना?

जगजाहीर नशा केली, न्यूड फोटो शूट केले, वादात अडकली, आता शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे रिहाना?

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

(Shivsena slams Kangana Ranaut over comment about farmers protest)

Published On - 5:33 pm, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI