शिवसेनेतील ‘त्या’ गद्दारांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याची गरज…उद्धव ठाकरे यांचा शिंदेसेनेवर हल्ला
राज्यातील महाराष्ट्रद्रोही सरकारकडून कारण नसताना हिंदीची सक्ती लादली जात आहे. त्यासाठी सर्व मराठी प्रेमी एकत्र आले आहेत. राज्यात इतर कोणतीही भाषा सक्तीने आम्ही लादून घेणार नाही, असा इशारा शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेचा जन्म मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायविरोधात लढण्यासाठी झाला. भूमीपुत्राच्या लढ्यासाठी झाला आहे. महाराष्ट्रात त्यांना हुकुमशाही लादायची आहे. एकाधिकारशाही आणायची आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात शिवसेना संपवायची आहे. शिवसेनेतील गद्दार जे मिंधेपणाने त्यांच्यासोबत राहत आहेत. शिवसेनेच्या त्या गद्दरांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याची गरज आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेसाठी अनेक निर्णय घेतले होते. त्याची अंमलबजावणी झाली नाही. अजित पवार आता गप्पा का?. मराठी भाषा भवनाची एक विट सुद्ध रचली गेली नाही. ती जागाही बिल्डरांना दिली की काय? असा हल्ला शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर केला.
महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. दीपक पवार यांच्याकडून उभारण्यात येणाऱ्या या आंदोलनास त्यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
हिंदी सक्ती मागे घेईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील महाराष्ट्रद्रोही सरकारकडून कारण नसताना हिंदीची सक्ती लादली जात आहे. त्यासाठी सर्व मराठी प्रेमी एकत्र आले आहेत. राज्यात इतर कोणतीही भाषा सक्तीने आम्ही लादून घेणार नाही. आम्ही सक्ती चालू देणार नाही. हिंदी सक्ती जोपर्यंत मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु होणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
राज्यात सर्व सुरळीत असताना हिंदी सक्ती का?
राज्यात सर्व काही सुरळीत सुरु आहे. त्यात हा मीठाचा खडा टाकला गेला आहे. आमचा हिंदीला विरोध नाही. महाराष्ट्रात हिंदी चित्रपटसृष्टी जोपसली गेली. महाराष्ट्रात हिंदी चित्रपट तुफान चालतात. अनेक हिंदी कलाकार महाराष्ट्रात मोठे झाले. महाराष्ट्रात सर्वांना हिंदी येते. मग हिंदी सक्तीची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदी सक्तीमागे त्यांचा छुपा अजेंडा आहे. हिंदी सक्तीची याचा अर्थ कालांतराने एक निशाण, एक विधान म्हणजे मीच असा आहे. जे.पी.नड्डा यांनी त्यासंदर्भात मागे वक्तव्य केले होते. या माध्यमातून एकाधिकारशाहीकडे त्यांची वाटचाल दिसत आहे. मराठी भाषिकांवर आणीबाणी ते लादत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
