पूल दुर्घटनेचा उद्धव ठाकरेंच्या भाषणात साधा उल्लेखही नाही!

पूल दुर्घटनेचा उद्धव ठाकरेंच्या भाषणात साधा उल्लेखही नाही!

अमरावती : शिवसेना आणि भाजप युतीचा पहिला संयुक्त मेळावा अमरावती लोकसभा मतदारसंघात पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी उपस्थितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, काल रात्री मुंबईत पूल दुर्घटना घडून, सहा जणांचा मृत्यू, तर 34 जण जखमी झाले. या दुर्घटनेची घटनास्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. मात्र, मुंबईचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ना घटनास्थळाला भेट दिली, ना रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

मुंबईत हाकेच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळा भेट न देताच, उद्धव ठाकरे युतीच्या पहिल्या मेळाव्यासाठी अमरावतीत गेले. विशेष म्हणजे, युतीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्व, विरोधक इथपासून अगदी सगळ्या मुद्द्यांवर खणखणीत भाषण केलं. मात्र, मुंबईतल्या पूल दुर्घटनेवर एक अवाक्षर उद्धव ठाकरे यांनी काढला नाही. आपल्या असंवेदनशीलतेचं दर्शन उद्धव ठाकरे यांनी पूल दुर्घटनेनंतर दाखवल्याची चर्चा सर्वसामान्यन नागरिकांमध्ये आहे.

मुंबईत सीएसएमटी स्टेशनबाहेर जो पूल कोसळला आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तो पूल मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येत होता. मात्र, मुंबईच्या महापौरांनी सुरुवातीला हा पूल पालिकेच्या अंतर्गत येत नसल्याचा दावा केला. अखेर हा पूल मुंबई महापालिकेच्या अंतर्गतच येत असल्याचे उघड झाले आणि महापौरांसह महापालिका तोंडावर आपटली.

याच महापालिकेत शिवसेनेची गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सत्ता आहे. त्याच महापालिकेचा पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नेते किंवा पालिकेत सत्ता गाजवणाऱ्या पक्षाचे प्रमुख म्हणून दुर्घटनास्थळी जाऊन साधी पाहणी सुद्धा केली नाही. किंबहुना, रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI