Uddhav-Raj Thackeray: ठाकरे ब्रँडचा धडाका! संयुक्त मुलाखत ते सभा आणि लवकरच जाहीरनामा…मुंबईतील सर्वात मोठी अपडेट काय?

Uddhav Thackeray-Raj Thackeray: तब्बल 18 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सरत्या वर्षात एकत्र आले. मुंबई,मराठी भाषा, मराठी माणसांसाठी एकत्र हाल्याचा हाकारे वाजले. तर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे ब्रँड धुराळा उडवून देणार असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मोठी अपडेट तुम्हाला कळली का?

Uddhav-Raj Thackeray: ठाकरे ब्रँडचा धडाका! संयुक्त मुलाखत ते सभा आणि लवकरच जाहीरनामा...मुंबईतील सर्वात मोठी अपडेट काय?
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनसे, शिवसेना
Image Credit source: संजय राऊत यांचे ट्विटर हँडल
| Updated on: Jan 03, 2026 | 10:20 AM

Thackeray Brand in BMC Election 2026: सरत्या वर्षात राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली. दोन ध्रुव 18 वर्षांनी एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गेल्या वर्षी मे महिन्यात मराठी भाषा आणि शाळेतील हिंदी सक्तीकरणाविरोधात एकत्र आले, तेव्हापासून मुंबईच्या राजकारणात खळबळ उडणार हे नक्की होतं. आता मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत. मनसे आणि शिवसेना ही निवडणूक एकत्रित लढत आहेत. आता प्रचारासाठी अवघा काही कालावधी उरला आहे. ठाकरे ब्रँड प्रचाराचा धुराळा उडवून देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी संयुक्त मुलाखत, संयुक्त सभा ते अनेक विषय अजेंड्यावर आहेत. काय आहे मुंबईतील मोठी घडामोड?

ठाकरे बंधुंची फायर ब्रँड मुलाखत

राज ठाकरे हे तर फायब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष असते. तर उद्धव ठाकरे हे सुद्धा खास शैलीत भाषण करतात. आता या दोन्ही नेत्यांची संयुक्त मुलाखत घेण्यात येणार आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याची माहिती दिली. या मुलाखतीविषयीचा तपशील त्यांनी समोर आणलेला नाही. पण ही मुलाखत लवकरच होण्याची शक्यता आहे. मनसे आणि शिवसैनिकांमध्ये चैतन्य भरण्यासाठी हा खास प्रयोग होत असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा किती फायदा होईल हे निकालात स्पष्ट होईल.

उद्या संयुक्त वचनामा

तर 4 जानेवारी रोजी रविवारी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. या परिषदेत ते दोन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा प्रकाशित करणार असल्याचे समोर येत आहे. या वचननाम्यानंतर दोन्ही बंधु प्रचाराच्या रणधुमाळीत उतरतील. या पत्रकार परिषदेनंतर लागलीच त्यांची पहिली संयुक्त जाहीर सभा सुद्धा होणार आहे. त्यामुळे संयुक्त मुलाखत, संयुक्त पत्रकार परिषद, संयुक्त वचननामा आणि संयुक्त प्रचार सभा यातून प्रचाराचा नारळ फोडल्या जाईल.

6 जानेवारी रोजी ठाकरे बंधुंची संयुक्त सभा

मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या तीन संयुक्त सभा होत आहेत. पहिली सभा 6 जानेवारी रोजी होईल. ही सभा मुंबईतील पूर्व उपनगरात होणार आहे. दुसरी सभा पश्चिम उपनगरात तर तिसरी सभा मुंबईत होणार आहे. प्रचाराचा नारळ 6 जानेवारी रोजी फुटेल. तर तिसऱ्या सभेत प्रचाराची सांगता होईल. या सभांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संबोधित करतील. या सभेतून ते कुणाचा आणि कसा तिखट समाचार घेतात याकडे कार्यकर्त्यांचे आणि विरोधकांचे पण लक्ष लागलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. यामध्ये उद्धव सेना, 164 जागांवर, मनसे 53 जागांवर तर राष्ट्रवादी 11 जागांवर महापालिका निवडणूक लढवत आहे.