भाजपाच्या अहंकाराचा फुगा फोडायचाय आणि विजयाचा गुलाल उधळायचाय , उद्धव ठाकरे यांचा निर्धार
भाजपा आत्म निर्भर भारत तयार करायला निघालाय पण ते स्वत: आत्मनिर्भर बनू शकले नाहीत, त्यांना सरकार करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची गरज लागत आहे अशा शब्दात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे.

भाजपाच्या अहंकाराचा फुगा फोडायचा आहे आणि विजयाचा गुलाल उधळायचा आहे अशा शब्दात शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिकेवर विजयाचा निर्धार व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की भाजपाच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत त्यांच्यातच आता जुंपली आहे. एकमेकांचा पक्ष फोडण्यासाठी ते टपले आहेत. यांचा वापर करुन त्यांना आता फेकून देणार आहेत. काल दिल्लीला काही जण गेले तक्रार घेऊन गेली की बाबा मला माललं, बाबा तो ओलडला…एवढी लाचारी…. शिवसेनेत असताना तुम्हाला दुखावण्याची कोणाची हिंमत होती का ? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी लढले होते. त्यामुळे ही मुंबई लुटूली जात असताना आपण शांत बसू हे शक्य नाही. त्यामुळे काही झाले तरी आपण भाजपाचा अहंकाराचा फुगा फोडणारच आणि मुंबई महानगर पालिकेत विजयाचा गुलाल उधळणारच असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी निष्क्षून सांगितले.
मशालीची उब घेतली आता धग सोसा
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात. ज्यावेळी शिवसेना प्रमुखांचे ‘फटकारे’ हे पुस्तक आम्ही तयार करत होतो. त्यावेळी त्या कार्टूनमध्ये मशाल घेतलेला एक तरुण शिवसैनिक होता. त्याच्याशेजारी कमळ घेतलेला तेव्हाचा जनसंघ होता वाटतं. हीच निवडणूक निशाणी मशाल उगीच घेतलेली नाही. मोदी आणि शहांची आरती करायची असती तर उदबत्ती घेतली असती ना. आता तुम्ही मशालीची उब घेतली आता धग सोसा अशा शब्दात ठाकरे यांनी यावेळी भाजपावर टीका केली.
टांगती तलवार डोक्यावर ठेवायची
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की नुकताच अजित पवार यांच्या मुलाचा घोटाळा बाहेर आला. आता यांचे घोटाळे बाहेर येत आहे. कोणी काढला हा घोटाळा. आधी घोटाळे काढायचे नंतर क्लीन चीट देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आहेतच. यांचे घोटाळे बाहेर काढायचे नंतर मापात राहा सांगायचे आणि टांगती तलवार कायम डोक्यावर ठेवायची असा सर्व प्रकार सुरु असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.
फडणवीस यांनी शिवसेनेची माफी मागावी
पालघरच्या साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपात घेतले नंतर काढून टाकले याचा समाचार ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले की पालघर येथे भाजपने त्या चौधरीला प्रवेश दिला. तो चौधरी या हत्याकांडात सामील असेल तर प्रवेश का दिला? आणि नसेल तर प्रवेश का थांबवला, जर यात काही खोटं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची माफी मागावी असेही ते म्हणाले. भाजपा आत्म निर्भर भारत तयार करायला निघालाय पण ते स्वत: आत्मनिर्भर बनू शकले नाहीत, त्यांना सरकार करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची गरज लागत आहे. भाजप म्हणजे भ्रष्टाचार तितुका मेळवावा, भाजपा वाढवावा अशा शब्दात भाजपावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
