मिटकरी, ठोंबरे यांना दूर सारणे, हे NCP च्या सेक्युलर मुखवट्याला तडे ?
राजकारणात संघटनात्मक फेरबदल आवश्यक असतात. परंतु जेव्हा सातत्याने पक्षाच्या पारंपारिक विचारसरणीचे संरक्षण करणाऱ्या आवाजांनाच लक्ष्य केले जाते. तेव्हा ते बदल धोरणात्मक वाटत नाहीत. ते संपूर्ण विचारसरणीच पोखरण्याचे काम करतात.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP)- 2025 त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून आणि प्रवक्तेपदावरुन काही नेत्यांची उचलबांगडी केली आहे. या पक्षात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर फाटाफूटही सुरु आहे.आपल्या पक्षाचा चेहरा महायुतीत राहूनही जाणीवपूर्वक धर्मनिरपेक्ष ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या धार्मिक ध्रुवीकरणाला ठाम विरोध करणाऱ्या एनसीपीने आता आपला सेक्युलर तोंडवळा दूर सारला आहे का ? असा सवाल केला जात आहे.
अमोल मिटकरी यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन दूर करणे, सलीम सारंग आणि रुपाली ठोंबरे यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळणे यामुळे हा सवाल केला जात आहे.या तिन्ही नेत्यांनी कठीण काळात पक्षाच्या विचारधारेचे पालन केले होते. त्यांनाच आता दूर केल्याने राष्ट्रवादीची भूमिका बदलली आहे की केवळ पक्ष शिस्त म्हणूनही कारवाई केली असा सवाल केला जात आहे. काही अंतर्गत सूत्रांच्या मते, हे पक्षातील नियमित फेरबदल नसून त्यांना पद्धतशीरपणे दूर ठेवण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
स्पष्ट बोलण्याची किंमत?
अमोल मिटकरी आणि सलीम सारंग या दोघांनीही आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम समुदायाविरोधातील प्रक्षोभक वक्तव्यांचा खुलेपणाने सामना केला होता.आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम मालकाच्या दुकानांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करून धार्मिक तेढ वाढवण्याचा उघड प्रयत्न केला होता.परंतु आश्चर्य म्हणजे, जगताप यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न करता, पक्षाच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांचे समर्थन करणाऱ्या मिटकरी आणि सलीम सारंग यांनाच बाजूला केले आहे.
एकेकाळी एनसीपीच्या संवाद रणनीतीचे मुख्य शिल्पकार असलेल्या अमोल मिटकरी यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आले आहे. तर अल्पसंख्यांकात पक्षाचा चेहरा असलेले सलीम सारंग यांना कोणतेही स्पष्ट कारण न देता त्यांना स्टा प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे.त्यामुळे अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांत नाराजी पसरलेली आहे. त्यामुळे पक्षात जगताप यांना विरोध कराल आणि धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धराल तर तुमची जागा धोक्यात आहे असा तर संदेश यातून राष्ट्रवादी पक्ष देत नाही ना असा सवाल केला जात आहे.
जाणूनबुजून खच्चीकरण?
सलीम सारंग यांना दूर करणे हे पक्षाच्या धर्मनिरपेक्ष धोरणाला तडा गेल्याचे लक्षण आहे. शिव–शाहू–फुले–आंबेडकर या वैचारिक अधिष्ठानावर मुस्लीम समाजाशी संवाद साधण्याचे त्यांचे काम आणि राष्ट्रवादी अल्पसंख्यांक संपर्काचा ते आधारस्तंभ मानले जात होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सलीम सारंग यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्याने, पक्ष सर्वसमावेशकतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आवाजांपासून दूर जात असल्याची भीती व्यक्त होत आहे.
रूपाली ठोंबरे यांना दूर करणे
रूपाली ठोंबरे यांचे नाव देखील यादीत नसणे अनेकांना खटकले आहे. पक्षाची भूमिका निर्भयपणे आणि स्पष्ट शब्दांत मांडणारी नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पढण्याच्या झालेल्या प्रसंगाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. ऐतिहासिक जागा सर्वांची असेत, एका धर्माची नाही, असे त्यांनी म्हटले होते. पक्षाने त्यांच्यावर अन्याय केल्याचे म्हटले जात आहे. नवीन यादीतून त्यांना वगळणे हा धर्मनिरपेक्ष आणि समावेशक भूमिकांचे समर्थन करणाऱ्यांना बाजूला करणे हा पक्षाच्या सध्याच्या बदललेल्या कार्यपद्धतीचा पुरावा मानले जात आहे.
पक्षात कनिष्ठ कार्यकर्त्यांना “राजकीय निरीक्षक” म्हणून नेमण्यात आले असताना, सलीम सारंग आणि ठोंबरे याअनुभवी आणि तज्ज्ञ नेत्यांना वगळणे हे न कळण्यापलीकडचे असून त्यामुळे पक्षाचा भूमिका नेमकी काय आहे याबद्दल कार्यकर्ते गोंधळले आहेत.
राष्ट्रवादीचा वैचारिक बदल?
निवडणूकीच्या तोंडावर केलेले हे फेरबदल आणि त्यामागील कारणे अस्पष्ट असताना पक्षात वैचारिक पुनर्संरचनेचे संकेत मिळत आहेत. नवी प्रचारक यादी पक्षाच्या वैचारिक विविधतेचे संतुलित प्रतिबिंब न राहता, विशिष्ट शक्ती केंद्रांच्या प्रभावाचे प्रतीक बनली आहे असा अनेक तळागाळातील कार्यकर्त्यांचा दावा आहे.
गेल्या निवडणूकीत अजित पवार यांचा मोठा प्रभाव असलेली यादी आणि आता सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेली नवीन यादी या दोन वेगवेगळ्या नेतृत्वामुळे पक्षातील निष्ठांचे रसायन बदलत आहे.
राष्ट्रवादीला उत्तर द्यावे लागेल
2025–26 च्या स्थानिक निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एका निर्णायक वळणावर उभी आहे.ज्या नेत्यांनी पक्षाच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचे परंपरेने रक्षण केले, त्यांनाच बाजूला केल्याने एक प्रश्न निर्माण झाला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वैचारिक मुळांपासून दूर जात आहे का?
आता नेतृत्वाने वाढत्या असंतोषाकडे, विशेषतः अल्पसंख्याक कार्यकर्ते आणि धर्मनिरपेक्ष नेत्यांकडे लक्ष दिले नाही, तर पक्षातील हे अंतर्गत मतभेद भविष्यात पक्षासाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. पक्षावर विश्वास टाकणाऱ्या सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्ष प्रशासनावर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना यातून चुकीचा,अस्वस्थ करणारा संदेश जात आहे.
